सर्व मराठी भाषिकांचं भाषावार प्रांत रचनेच्या आधारे मराठी भाषिक राज्य स्थापन करण्यात यावं, या मागणीसाठी मोठं आंदोलनं उभं राहिलं. ते लढलं गेलं. प्रत्येक मराठी माणसाला हा लढा आपला वाटला. संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे! असं म्हणत १९५० ते ६० या दशकात महाराष्ट्र पेटून उठला. दिल्लीलाही अखेर माघार घ्यावी लागली आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीची घोषणा केली. तब्बल दशकभर चाललेल्या लढ्याची स्वप्नपूर्ती झाली… पण, मराठी माणसाला अपेक्षित असलेला संयुक्त महाराष्ट्र अजूनही अस्तित्वात आलेला नाही. त्यासाठीचा लढा १९६० पासून आजतागायत सुरू आहे. कारण संयुक्त महाराष्ट्राची पहिल्यांदा मागणी करण्यात आलेला भागच महाराष्ट्रापासून विलग करण्यात आला. तो महाराष्ट्रात यावा म्हणून महाराष्ट्र न्यायालयात बाजू लढतोय… प्रत्येक मराठी माणूस या लढ्याकडं आत्मियतेनं बघत असतो.
संयुक्त महाराष्ट्राचा लढा स्वातंत्र्योत्तर भारतात लढला गेला असला तरी मराठी भाषिक राज्य झालं पाहिजे ही मागणी भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच करण्यात आली होती. ते साल होतं १९४६. पण खेदाची बाब म्हणजे जिथे ही मागणी करण्यात आली, तो भागच आज संयुक्त महाराष्ट्रात नाही. आम्हाला महाराष्ट्रात जायचं म्हणून इथला मराठी माणूस अजूनही लढत आहे. १२ मे १९४६ रोजी बेळगाव येथे मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या संमेलनाच्या व्यासपीठावरून संमेलनाध्यक्ष ग. त्र्यं. माडखोलकर यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा पुरस्कार केला. त्यानंतर या लढ्यानं आकार घेण्यास सुरूवात केली.
पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाले. भाषांवार प्रांतरचनेच्या आधारावर त्रिराज्य योजना आखण्यात आली. मराठी माणसानं लढा तीव्र करत. ही योजना उधळून लावली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, असं म्हणत नेटानं लढा दिला गेला. अनेक चर्चा, बैठकीनंतर अखेर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य केली. १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राचा जन्म झाला. पण, यात एक लचका तुटला. मराठी भाषिक असलेला बेळगाव कारवार, निपाणी हा भाग कर्नाटकात गेला. तेथील मराठी माणूस आम्हाला महाराष्ट्रात जायचं म्हणून आजही काळा दिवस पाळतो. कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा सामना करतो.
हा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समिती स्थापन करण्यात आली. गेल्या सहा दशकांपासून इथला माणूस मराठी बाणा घेऊन लढा देत आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकार न्यायालयात लढा देत आहे. हा भाग महाराष्ट्रात येईल तेव्हाच खऱ्या अर्थानं संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात येईल, मराठी माणसाची भावना आहे. हा लढा अजून सुरू असून, अनेकांनी त्यासाठी काठ्या लाठ्या खाल्ल्या आहेत. खात आहेत.