महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की ६ डिसेंबर १९९२ च्या दिवशी कारसेवकांनी बाबरीचा कलंकित ढाचा पाडला तेव्हा मी तिथे उपस्थित होतो. मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी तिन्ही वेळा कारसेवेत गेलो होतो. बाकीचे तेव्हा कुठे लपले होते त्यांच्यावर कशाला बोलायचं? असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“देशात ५०० वर्षांच्या संघर्षानंतर प्रभू श्रीरामाचं मंदिर तयार होतो आहे. आपल्यावर जो कलंक बाबरने लावला होता तो हटवण्याचं काम आम्ही करत आहोत. या देशाची आस्था असलेल्या रामाची मूर्ती मंदिरात असणार आहे. अशावेळी राजकारण करणं हे अत्यंत हीन दर्जाचं आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा सगळे मतभेद विसरुन रामापुढे हात जोडले पाहिजेत आणि संपूर्ण देश राममय कसा होईल ते पाहिलं पाहिजे.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच बाबरीचा उल्लेख करत त्यांनी शिवसेनेलाही टोला लगावला आहे.
हे पण वाचा- कसं होतं सरतं वर्ष? देवेंद्र फडणवीसांनी पोस्ट केलेला व्हिडीओ चर्चेत
बाबरीचा ढाचा पाडला तेव्हा मी तिथे उपस्थित होतो
“मी काही लोकांची पर्वाच करत नाही. जेव्हा कारसेवा करायची होती तेव्हा हे लोक लपून बसले होते. हे कुणीही कारसेवेसाठी गेले नाहीत. मी त्यांच्यावर काय बोलायचं? आम्ही कारसेवक आहोत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. तिन्ही कारसेवांमध्ये मी गेलो होतो. मी बदायूच्या तुरुंगात गेलो आहे. जेव्हा कलंकित ढाचा पाडला गेला तेव्हाही मी तिथे उपस्थित होतो. आता काही लोक जळतात कारण ते घाबरुन घरी बसले होते. मी त्यांच्याविषयी कशाला बोलायचं?” असा प्रश्न विचारत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेलाच टोला लगावला आहे.
रामाचं मंदिर देशात तयार होतं आहे. हे पर्व सगळ्या देशाचं आहे, देशातल्या प्रत्येक हिंदू माणसाचं आहे. देशात भारतीय संस्कृती मानणाऱ्या प्रत्येकाचं मंदिर आहे. आपली अस्मिता प्रस्थापित करण्याचं होतं आहे. ज्याला वाटतं आहे मी हिंदू आहे, ज्याला वाटतं मी भारतीय आहे अशा प्रत्येक व्यक्तीसाठी हे पर्व आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.