उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेकडे असेल असंही बोललं जात आहे. यासंबंधीच्या हालचाली सुरु असून राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रियादेखील उमटत आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्रीपदी विराजमान असणाऱ्या अजित पवारांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद आणि शिवसेनेकडे विधानसभा अध्यक्षपद जाणार असल्याच्या वृत्तावर बोलताना ते म्हणाले की, “अशा बातम्यांमध्ये काही तथ्य नसतं. महाविकास आघाडी एक वर्षापूर्वी अस्तित्वात आली. त्यावेळी सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र बसून जे निर्णय घेतले त्यांची अमलजबजावणी सगळे करत आहोत”. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर बोलताना हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचं त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा- “अजित पवार पुन्हा नॉटरिचेबल होण्याची वेळ आलीये”; भाजपा नेत्याकडून राजकीय भूकंपाचा इशारा

निलेश राणेंचा टोला
निलेश राणे यांनी ट्विटरवरुन अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘अजित पवार यांना कधी मुख्यमंत्री होता आलं नाही आणि ते कधी होणार पण नाहीत,’ असा टोला निलेश यांनी लगावला आहे. तसेच ‘अजित पवार यांना कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं पण आता महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री मिळणार अशी चर्चा आहे,’ असंही निलेश यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. ‘अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आलीय,’ असा उल्लेख करत निलेश यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार नॉटरिचेबल झाले होते हा जुना दाखला देण्याचा प्रयत्न केलाय. त्याचप्रमाणे निलेश यांनी आपल्या ट्विटमध्ये राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीमधील तिसरा पक्ष असणाऱ्या काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे असंही म्हटलं असून उपमुख्यमंत्रीपद हा काँग्रेसचा हक्क असल्याचंही म्हटलं आहे.

“अजित पवारांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही व ते कधी होणार नाहीत पण कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं पण आता २ उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार अशी चर्चा आहे म्हणजे अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली. काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे,” असं ट्विट त्यांनी केलं आहे.

Story img Loader