केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजपा आणि शिवसेना नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरु आहे. अमित शाह यांनी ‘उद्धव ठाकरेंना धडा शिकवा’ असा आदेश दिल्यानंतर शिवसेना नेत्यांकडून त्यांना प्रत्युत्तर दिलं जात आहे. उद्धव ठाकरे यांनीही अमित शाह यांच्या टीकेला उत्तर दिलं असून, ‘मुंबईत मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती दोन्ही पाहिले’ असा टोला लगावला आहे. यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली असून ते निराशेतून बोलत असल्याचं म्हटलं आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरेंना निराशा आली आहे. या निराशेतून ते बोलत आहेत. अशा निराश लोकांवर फार काही बोलायचं नसतं,” असा टोला फडणवीसांनी लगावला आहे. दरम्यान दसरा मेळाव्यासाठी सरकारने कोणतेही मैदान ब्लॅाक केलेलं नाही. नियमात जे असतील त्यांना मैदाने दिली जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
अमित शाह काय म्हणाले होते –
अमित शाह यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये टीका करताना “त्यांना जमीन दाखवण्याची वेळ आली आहे” असं विधान केलं. ‘‘भाजपा आणि जनतेला दगा देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आगामी निवडणुकांमध्ये भुईसपाट करा. धोका देणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे’’, अशी भूमिका घेत शाह यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी युती करून भाजपा आगामी निवडणुका लढवणार असून, मुंबईसह महाराष्ट्रात भाजपाचे वर्चस्व आणि सत्ता राहील, यादृष्टीने तयारी करण्याचे आदेश शहा यांनी दिले.
उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर –
याच भाषणाला संदर्भ उद्धव यांनी मातोश्रीवर काही मोजक्या शिवसेना आमदार आणि खासदारांच्या उपस्थित पार पडलेल्या बैठकीत दिला. “काल मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती दोन्ही बघितल्या आपण. ते मंगलमूर्तीच्या दर्शनाला आले होते. ती मंगलमूर्ती आहे तिथे अभद्र काही बोलू नये पण ते बोलून गेले,” असा टोला उद्धव यांनी अमित शाह यांचा थेट उल्लेख न करता लगावला. तसंच पुढे बोलताना उद्धव यांनी, “गणपतीच्या मंडळामध्ये सुद्धा त्यांना राजकारण दिसलं त्याला आपण काही करु शकत नाही,” असंही म्हटलं. “मी एवढं सांगेन की गणपती हा बुद्धीदाता आहे. सर्वांना त्याने सुबुद्धी द्यावी हीच माझी गणरायाकडे प्रार्थना आहे,” अशी खोचक प्रतिक्रिया उद्धव यांनी दिली.
उद्धव ठाकरे आणि तुम्ही पुन्हा एकत्र येणार का? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले…
“काल ते येऊन बोलून गेले की शिवसेनेला जमीन दाखवायची. दाखवा. ती जमीन दाखवल्यानंतर त्यावर काय बोलायचं ते बोलू. थोडक्यात सांगायचं तर आता संघर्षाचा काळ आहे. शिवसेना ते संपवायला निघालेले आहेत. या संघर्षाच्या काळात जो सोबत राहतो तो आपला,” असंही उद्धव यांनी आमदारांसोबतच्या या खासगी बैठकीमध्ये म्हटलं. यानंतर उद्धव ठाकरेंनी उपस्थित आमदारांचा उल्लेख करत त्यांनी निष्ठा विकली नाही असं म्हटलं. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे गटातील ४० फुटीर आमदारांवर टीका करताना उद्धव यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या वाक्याचा संदर्भ दिला.
शिंदे गटाचा अप्रत्यक्षपणे ‘नासलेली लोक’ असा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला. “भास्करराव, रविंद्र वायकर, अनिल परब, सुनिल प्रभू आणि इतर आमदाराही इथे आहेत. या आमदारांना ते लालूच दाखवून नेऊ शकत होते. का नाही नेऊ शकले? कारण शेवटी निष्ठा हा असा विषय असतो की तो कोणी कितीही बोली लावली तरी तो विकला जाऊ शकत नाही आणि कोणी विकतही घेऊ शकत नाही. त्यामुळे हे सर्व निष्ठावान सोबत राहिले. बाळासाहेब सांगायचे तसेच नासलेली लोक असण्यापेक्षा मूठभर का असेना निष्ठावान असले तरी मैदान निघतं सगळं,” असं उद्धव म्हणाले.