Former Chairman of Tata Sons Died in Car Accident in Mumbai: टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्याने उद्योगक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रांकडून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही धक्का बसला आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ट्विटरवरुन त्यांनी ही माहिती दिली आहे.
सायरस मिस्त्री यांचं पालघरमध्ये अपघाती निधन
पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. अपघातानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळत आहे. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारासा सूर्या नदीवरील पुलावर चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकाला कार आदळून हा अपघात झाला. अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दोघे जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट
“प्रख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनाने उद्योग आणि आर्थिक जगताची मोठी हानी झाली आहे. भारताची आर्थिक शक्ती ओळखणारे, एक उमदे असे ते व्यक्तिमत्व होते. विनम्रता हा त्यांचा स्थायीभाव होता. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या, आप्तस्वकियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत,” अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या आहेत.
“पालघरनजीक झालेल्या या दुर्दैवी अपघाताबाबत माहिती घेतली असून राज्याच्या पोलीस महासंचालकांना या अपघाताची सखोल चौकशी करण्यास सांगितलं आहे,” अशी मााहिती यावेळी त्यांनी दिली.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित अनेक राजकीय नेत्यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे.
राहुल गांधी यांचं ट्वीट
एकनाथ शिंदेंकडून श्रद्धांजली
“टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. सायरस मिस्त्री हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,” अशा भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.