आज विधिमंडळात २०२१-२०२२ चा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत १२.१ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत ८.९ टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा आहे. राज्याच्या कृषी तसेच कृषीपुरक क्षेत्रातही ४.४ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.
करोना महामारीमुळे मागील दोन वर्षांपासून राज्याच्या विकासाची गती मंदावलेली आहे. मात्र करोनाचा प्रादुर्भाव कमी होताच उद्योग, सेवा, कृषी क्षेत्राने कात टाकली असून या क्षेत्रांना पुन्हा एकदा उभारी मिळत आहे. २०२१-२२ च्या आर्थिक पाहणी अहवालात या सर्वच क्षेत्रांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा नोंदवण्यात आलीय. कृषी क्षेत्रासोबतच पशुसंवर्धन, वने व लाकूड तोडणी, मत्स्यव्यवसाय व मत्स्यशेती यांच्यातदेखील वाढ होण्याचे अपेक्षित असल्याचे आर्थिक पाहणी अहवालात सांगण्यात आले आहे.
२०२१-२२ नुसार राज्याचा महसुली खर्च ३,७९,२१३ कोटी
सन २०२१-२२ अर्थसंकल्पीय अंदाजानुसार राज्याची महसुली जमा १३.६८,९८७ कोटी, तर सन २०२०-२१ सुधारित अंदाजानुसार १२,८९,४९८ कोटी आहे. अर्थसंकल्पीय अंदाज २०२१-२२ नुसार कर महसूल आणि करेतर महसूल (केंद्रीय अनुदानासह) अनुक्रमे ₹२,८५,५३४ कोटी आणि २,८३,४५३ कोटी आहे. अर्थसंकल्पीय अंदाज २०२१-२२ नुसार राज्याचा महसुली खर्च ३,७९,२१३ कोटी असून २०२०-२१ च्या सुधारित अंदाजानुसार ३,३५,६७५ कोटी रुपये आहे.
सेवा क्षेत्रात १३.५ टक्क्यांची वाढ अपेक्षित
करोना महामारीनंतर राज्याच्या उद्योग क्षेत्राने मोठी उभारी घेतली असून या क्षेत्रात ११.९ टक्क्यांची तर सेवा क्षेत्रात १३.५ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. राज्याचे २०२२१-२२ मधील स्थूल राज्य उत्पादन ३१,९७,७८२ कोटी अपेक्षित आहे.
खरीप हंगामामध्ये १५५.१५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण
राज्यात मान्सून २०२१ मध्ये सरासरी पावसाच्या ११८.२ टक्के पाऊस पडला. राज्यातील १८७ तालुक्यांमध्ये अतिरिक्त, १४६ तालुक्यांमध्ये सरासरी आणि २२ तालुक्यांमध्ये अपुरा पाऊस पडला. सन २०२१-२२ मध्ये खरीप हंगामामध्ये १५५.१५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण करण्यात आली. मागील वर्षाच्या तुलनेत तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, कापूस व ऊस यांच्या उत्पन्नात अनुक्रमे, ११ टक्के, २७ टक्के, १३ टक्के, ३० टक्के आणि ०.४ टक्के घट अपेक्षित आहे.
तृणधान्ये तसेच तेलबियांच्या उत्प्नन्नात अनुक्रमे २१ व ७ टक्के घट अपेक्षित
राज्याच्या रब्बी हंगामामध्ये जानेवारी अखेर ५२.४७ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण करण्यात आली. कडधान्याच्या उत्पन्नात १४ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. तृणधान्ये तसेच तेलबियांच्या उत्प्नन्नात अनुक्रमे २१ व ७ टक्के घट अपेक्षित आहे.