उशिरापर्यंत झोपणारे अशी प्रतिमा, नागरिकांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करीत सुरजागड प्रकल्पासाठी आग्रह, जनमानसाशी फारसा संपर्क नसलेल्या पालकमंत्री राजे अंबरीश यांच्या कर्तृत्वशून्य कारभारामुळेच गडचिरोली जिल्ह्य़ात भाजपला फटका बसला आहे. त्यांच्याच विधानसभा मतदारसंघात १६ पैकी अवघ्या चार जागा भाजपला जिंकता आल्या.

राजे अंबरीश आत्राम यांच्या कार्यपद्धतीमुळे जिल्हा परिषदेत भाजपला पूर्ण बहुमत मिळविण्यात अपयश आले आहे. पालकमंत्र्यांच्या अहेरी विधानसभा मतदारसंघातील १६ पैकी अवघ्या ४ जागा भाजपला जिंकता आल्या असून माजी आमदार दीपक आत्राम यांच्या आदिवासी विद्यार्थी संघाने ७ जागा जिंकून अंबरीश यांना आगामी विधानसभा निवडणूक कठीण असल्याचे संकेत दिले आहेत.

५१ सदस्यीय गडचिरोली जिल्हा परिषदेत भाजप हा सर्वाधिक २० जागा जिंकून मोठा पक्ष म्हणून समोर आला असला तरी पालकमंत्री अंबरीश आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी व आमदार कृष्णा गजबे या मातब्बर नेत्यांच्या नेतृत्वाखाली लढली गेलेली ही निवडणूक भाजपसाठी पराभवापेक्षा काही कमी नाही. नक्षलग्रस्त आदिवासीबहुल जिल्ह्य़ाचा पालकमंत्री व राज्याचे आदिवासी विकास व वन राज्यमंत्री म्हणून आत्राम यांच्या हाती करण्यासारखे बरेच काही आहे. मात्र गेल्या दोन वर्षांतील त्यांची कामगिरी कर्तृत्वशून्य या सदरात मोडणारी आहे. एकही मोठा प्रकल्प किंवा विकास निधी त्यांनी खेचून आणलेला नाही. त्यांच्याच अहेरी विधानसभा मतदारसंघातील सुरजागड लोह उत्खनन प्रकल्प व मेडीगट्टा-कालेश्वरम सिंचन प्रकल्पावरून एटापल्ली, सिरोंचा व भामरागड तालुक्यात जनाक्रोश उफाळून समोर आल्यानंतरही पालकमंत्र्यांनी सुरजागड व मेडीगट्टाचा करार करण्यात धन्यता मानली. या दोन्ही प्रकल्पांवरून जनता रस्त्यावर उतरलेली असताना त्यांच्याशी संवाद साधण्याऐवजी पोलीस बंदोबस्तात सुरजागड प्रकल्प सुरू करण्याची घाईच त्यांच्या दारुण पराभवाला कारणीभूत ठरली. स्थानिक आदिवासी समस्या घेऊन शेकडो मैलांवरून पालकमंत्र्यांच्या भेटीसाठी राजवाडय़ावर येतात आणि ते दुपारी २-३ वाजेपर्यंत झोपलेले असतात, असा त्यांच्यावर लोकांचा आरोप आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या या झोपाळू कार्यपद्धतीचा अनुभव आला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आत्राम यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. माध्यमांनीही त्यांच्या या कार्यपद्धतीवर वेळोवेळी टीकास्त्र सोडले आहे. मात्र तरीही त्यात किंचितही बदल झालेला नाही. परिणामत:, आज भाजपला गडचिरोलीत सत्तास्थापनेसाठी संघर्ष करावा लागत आहे.

ग्रामसभेचे उमेदवार विजयी

गडचिरोली, चामोर्शी, वडसा, आरमोरी तालुक्यात यश संपादन करता आले त्या तुलनेत पालकमंत्र्यांच्या अहेरी विधानसभा मतदारसंघात भाजपचा दारुण पराभव झाला. अहेरी क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या अहेरी, भामरागड, सिरोंचा व एटापल्ली या चार तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या एकूण १६ जागा आहेत. ग्रामसभेचे उमेदवार सैनू गोटा व अ‍ॅड. लालसू नरोटे यांनी सर्वाधिक मतांनी विजय संपादन करून अंबरीश आत्राम यांना त्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात असल्याचा इशाराच दिला आहे. उमेदवारीवाटपातही पालकमंत्र्यांचा दबाव असल्यामुळे निष्ठावंतांना डावलण्यात आले. नागविदर्भ आंदोलन समितीचे निष्ठावंत पदाधिकारी रंगू बापू यांच्या मुलीचे तिकीट पालकमंत्र्यांनी रेतीतस्करांच्या दबावात कापले. त्याच्याच परिणामी सिरोंचा तालुक्यात भाजपला अपयश आले. आज भाजप व नागविदर्भ आंदोलन समितीपासून निष्ठावंत दुरावले असून कंत्राटदार, वाळूतस्कर, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते म्हणून मिरवताना दिसत आहेत. सिरोंचा येथील वाळूतस्करीचे प्रकरणही पालकमंत्र्यांच्या पराभवाचे एक प्रमुख कारण आहे. त्याचा परिणाम सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या तालुक्यांत कित्येक वर्षांपासून भाजपशी एकनिष्ठ असलेल्या कुटुंबांनी प्रचारापासून दूर राहणे पसंत केले. संघाचे वर्तुळही आत्राम यांच्या एकूणच कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत आहेत. येत्या काळात त्यांनी कार्यपद्धतीत सुधारणा केली नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नावामागे माजी आमदार हा शब्द लागेल.

untitled-9

Story img Loader