राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या मुद्द्यावर कुणालाही फुकटात वीज मिळणार नाही, असं म्हटलं आहे. आम्ही कर्ज घेऊन पैसे भरतो, मग ग्राहकाला आम्ही वीज कशी फुकट देऊ? असा सवाल नितीन राऊत यांनी विचारला. दुसरीकडे भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांनी यावरून सरकारवर हल्लाबोल केलाय. आम्ही वीज फुकट मागत नाही, मात्र थकबाकीसाठी महावितरण शेतकऱ्यांना ब्लॅक मेल करीत आहे, असा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी केलाय. तसेच चालू बिल भरण्यास शेतकरी तयार आहेत, असं असताना वीज कापली तर शेतकऱ्यांचा उद्रेक होईल. कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा बंब यांनी दिला.

“आधीच अतिवृष्टी झालीय. शासनाने त्याच्या मोबदल्यात ५-७ हजार रुपये दिलेत. त्यातही आता महावितरण बिल भरण्याची सक्ती करत आहे. पैसे नसताना बिल कसं भरायचं”, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. लोक मुदत देण्याची मागणी करत आहे. यावर बोलताना नितीन राऊत म्हणाले, “वीज कुणालाही फुकटात मिळणार नाही. वीजेचा वापर करत असाल तर वीजेचं बिल तुम्हाला भरावंच लागेल. महावितरण वीज फुकटात विकत घेत नाही किंवा त्यांना कुणी फुकटात वीज देत नाही. वीज निर्माण करणाऱ्या कंपन्यांना कोळसा घ्यावा लागतो. त्यांना बँकांचं कर्ज घ्यावं लागतं. त्यांना पैसा द्यावा लागतो.”

“तुम्हाला खासगी कंपन्या उतरवायच्या असतील तर उतरवा”

“महावितरणकडे पैसेच राहिले नाही तर महावितरण बंद होऊन जाईल. राज्यात महावितरणने काम केलं नाही तर या ठिकाणी खासगी कंपन्या उतरतील. तुम्हाला खासगी कंपन्या उतरवायच्या असतील तर उतरवा. मला त्याचं काहीही नाही, तो राज्य सरकारचा निर्णय राहणार आहे. राज्याचा उर्जामंत्री या नात्याने मी एवढंच सांगेल की शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांची मला जाण आहे आणि वीज ग्राहकांच्या प्रश्नांचीही मला जाण आहे. त्यामुळे मी अनेक उपाययोजना मी केल्यात,” असं नितीन राऊत यांनी सांगितलं.

“करोना आला, लॉकडाऊन होता तेव्हा २४ तास लाईट दिली”

कोळशाच्या अभावी संपूर्ण देशात वीज बंद पडली, लोड शेडिंग झाले तेव्हा मी आपल्या राज्यात तसं होऊ दिलं नाही. करोना आला, लॉकडाऊन होता तेव्हा २४ तास लाईट दिली. महापूर आला, अतिवृष्टी झाली त्यावेळीही लवकर धावत जाऊन वीज जोडणी पूर्ववत केली, असंही नितीन राऊत यांनी नमूद केलं.

हेही वाचा : “ युवक काँग्रेसच्या निवडणुकीत मुलाला जिंकवण्यासाठी नितीन राऊतांकडून महावितरणची यंत्रणा काँग्रेसच्या दावणीला ”

शेतकऱ्यांनी चालू विज बिल भरल्यानंतर वीज जोडणी कापता येणार नाही. मागील थकबाकीसाठी सरकारने शेतकऱ्यांना वेठीस धरू नये, असं मत प्रशांत बंब यांनी व्यक्त केलंय. ते म्हणाले, “आम्ही वीज फुकट मागत नाही, मात्र थकबाकीसाठी महावितरण शेतकऱ्यांना ब्लॅक मेल करीत आहे. चालू बिल भरण्यास शेतकरी तयार आहेत, असं असताना वीज कापली तर शेतकऱ्यांचा उद्रेक होईल. कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होईल.”

Story img Loader