सांगली : लोहमार्ग रुंदीकरणात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा, अनाधिकृत सीमा हद्दीचे उभारण्यात आलेले खांब दूर करावेत या मागणीसाठी वसगडे (ता. पलूस) येथे सुमारे पाच तासांहून अधिक काळ महाराष्ट्र एक्सप्रेस रोखण्यात आली आहे. रेल्वे पोलीस सुरक्षा दलाचे अधिकारी तोडगा काढण्याच्या प्रयत्नात असून सायंकाळपर्यंत लोहमार्गावरील वाहतूक बंद होती.
मिरज-पुणे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम करीत असताना लोहमार्गाच्या बाजूच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. या जमिनीचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. तसेच रेल्वे सीमा हद्दीसाठी शेतकर्यांच्या जमिनीत खांब रोवण्यात आले असून यामुळे गेल्या एक वर्षापासून या जमिनीत कोणतेही उत्पादन घेता आलेले नाही. याबाबत रेल्वे विभागाशी सातत्याने संपर्क साधून मोबदला मिळावा आणि अनाधिकृत उभारण्यात आलेले सीमाहद्दीचे खांब हटविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. मात्र, रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
हेही वाचा – भरपाईसाठी महाराष्ट्र एक्सप्रेस रोखली
हेही वाचा – नागपुरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी खूशखबर! सहलीसाठी ‘डबल डेकर’ ग्रीन बस
यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्यांनी बुधवारी दुपारपासून लोहमार्गावर ठिय्या मारला आहे. यामुळे कोल्हापूर ते गोंदिया जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस दुपारी एक वाजतापासून वसगडे हद्दीत उभी आहे. मिरज रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी थांबून आहेत. आंदोलकांना दूर करण्याचे प्रयत्न केले जात असले तरी शेतकरी आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. ठोस कृती समोर आल्याविना रेल्वे मार्गावरून बाजूला होण्यास त्यांनी नकार दिला आहे.