राज्याच्या अनेक भागांत हाहाकार उडवणाऱ्या गारपिटीला पंधरवडा उलटूनही सरकार अद्याप सर्वेक्षणातच अडकले असून प्रत्यक्षात कुठलीही मदत पोहोचलेली नाही. स्वयंसेवी संस्थांचे हातही या आपत्तीत आखडल्याने शेतीविश्वात कमालीचे नैराश्य आहे. गुरुवारी तीन शेतकऱ्यांनी जीव दिला असून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ७७ झाली आहे. यात मराठवाडय़ातील ३८, तर विदर्भातील ३१ शेतकरी आहेत.
गुरुवारी महाळु मनगीत चाफे (वय २३, दिंडेगाव, ता. तुळजापूर), परमेश्वर पुरभाजी बनसोडे (३०, रा. देगाव, ता. पूर्णा)  व संतोष अभानराव शंृगारे (२६, रा. रेणापूर, ता. कळमनुरी) यांनी आत्महत्या केल्या. २६ फेब्रुवारी ते १२ मार्चदरम्यान राज्यात कोकण वगळता सर्व विभागांत मोठी गारपीट झाली. त्यात हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. पशुधन व जीवितहानीही बरीच झाली. माध्यमांच्या सतर्कतेनंतर अनेकांचे आपत्तीकडे लक्ष गेले. मग नेत्यांचे दौरे, संथ सर्वेक्षण, आचारसंहितेत अडकलेली मदत.. या साऱ्यांत शेतकरी मात्र खचला आहे. प्रत्यक्ष मदतीस उशीर झाल्यास आत्महत्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
सर्वेक्षणाची ऐशी तैशी
मराठवाडय़ात गारपिटीने सर्वाधिक नुकसान होऊनही अनेक भागांत सर्वेक्षण सुरूच झालेले नाही. यातच पंचनाम्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीची अट घातल्याने याचा फटका अनेकांना बसणार आहे. सोलापूर जिल्हय़ातील मोहोळ तालुक्यात पंचनाम्यासाठी तलाठी पैसे घेत असल्याचे तर औरंगाबाद जिल्ह्य़ात एक तलाठी घरात बसूनच पंचनामे करत असल्याचे उघड झाले.