फूल बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्यांना फटका

रमेश पाटील, लोकसत्ता

वाडा :  करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र टाळेबंदी लागू झाल्याने बाजापेठांबरोबर फूल बाजारपेठाही बंद आहेत. त्याचा फटका विक्रमगडमधील मोगऱ्याच्या फुलबागा फुलविणाऱ्यांना शेकडो शेतकऱ्यांना बसला आहे.  विक्रीतून उत्पन्न देणाऱ्या मुंबई, सूरत येथील फूल बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. फुलवलेला मोगरा कोमेजण्याची वेळ आली आहे.

विक्रमगड तालुक्यातील खांड, वाकडूपाडा, ओंदे, साखरा, सुकसाले, कुंर्झे, उघाणी, उपराले, देहर्जा अशा अनेक गावांत शेतकऱ्यांनी मोगऱ्याची लागवड मोठय़ा प्रमाणात  केली आहे. यामुळे अनेक वर्षे दुर्लक्षित व बेरोजगारीने पिचलेल्या येथील लोकांना उत्तम अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.  या ठिकाणी मोगऱ्याचे दररोज साधारण ३० ते ३५ किलो उत्पन्न अनेकांना मिळते, ज्यात प्रति किलो ३०० ते ५०० इतका दर मिळत असतो. दादर व नाशिक या ठिकाणी मोगऱ्याला चांगली मागणी असते.  या मोगरा लागवडीमुळे येथील आदिवासींचे स्थलांतर थांबले. त्याचबरोबर या मोगऱ्यासोबत काही शेतकऱ्यांनी गुलाब आणि सोनचाफ्याची देखील लागवड केली आहे. त्यापासून देखील चांगले उत्पन्न हे शेतकरी आजतागायत घेत होते.

होळीपासून करोना विषाणूचा संसर्ग भारतात सुरू झाल्याने अन्य शेतीबरोबरच फूल शेतीवर गदा आली आहे.  मंदिरे, बाजारपेठा, लग्नसराई संचारबंदीत सापडल्याने फूलशेतीवर कुऱ्हाड कोसळली आहे. या टाळेबंदीत मोगरा उत्पादक  बेरोजगार झाला आहे.  ऐन सराईत मोगऱ्याची मागणी  ठप्प झाली आहे. यामुळे येथील शेतकरी अडचणीत सापडला आहे. काही दिवसांत पावसाळा सुरू होईल. त्यांनतर मोगरा उत्पादन बंद होईल.  या वर्षीचा हंगामात  लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

दरवर्षी मोगरा उत्पादनातून मिळणाऱ्या पैशातून वर्षभराचा संसारगाडा चालविण्यास मदत होते, मात्र या वर्षी करोनाच्या संकटात आमचा फू लशेतीचा व्यवसाय मोडीत निघाला.

– गोविंद धोडी, मोगरा उत्पादक शेतकरी, कुंर्झे, ता. विक्रमगड

Story img Loader