Raghuveer Khedkar on Gautami Patil : बऱ्याच गावातले लोक हे १०० लोकांच्या तमाशा कार्यक्रमाला २ लाख रूपये देण्यासाठी गयावया करतात. विनंती करतात, मात्र गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात चार मुली आणि पाचवी गौतमी पाटील यांना पाच-पाच लाख रूपये मोजतात. याला काय म्हणायचं? असं म्हणत ज्येष्ठ लोक कलावंत रघुवीर खेडकर यांनी आपल्या मनातली खंत बोलून दाखवली आहे. तसंच लोककलेची गौतमी पाटील होऊ देऊ नका असंही त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे रघुवीर खेडकर यांनी?
“मला हे सांगायचं आहे की बऱ्याच गावातले लोकं १०० कलावंत असणाऱ्या तमाशाला दोन लाख रूपये द्यायला कुंथतात, हात जोडतात, विनवण्या करतात. पण चार पोरी आणि पाचवी गौतमी पाटील तिला पाच-पाच लाख रूपये देतात. हे काय आहे? असं करू नका. लोककलेची ‘गौतमी पाटील’ करू नका. लोककला ही लोककलाच राहिली पाहिजे. तिचा तुम्ही ऱ्हास करू नका.”
पालकांना उद्देशून काय म्हणाले आहेत खेडकर?
“आपली मुलं कोणत्या वळणाला चालली आहेत? आई वडिलांचं लक्ष कुठे आहे? तुम्ही स्वतःला पालक समजता ना? मग आपला मुलगा रात्री कुणाच्या कार्यक्रमाला जातो हे विचारत का नाही? आज तुमच्या मुलांना हरिपाठ पाठ नाही पण गौतमी पाटीलची गाणी पाठ आहेत. काय चाललंय काय? तमाशाला आजवर तुम्ही नावं ठेवत होतात आजपर्यंत, आता काय चाललं आहे लक्ष द्या.”
तमाशात हातवारे कुठल्या पोरीने केले आहेत?
तमाशातल्या कुठल्या पोरीने असे हातवारे केले आहेत? कधी केले होते? ५० ते ६० वर्षे मी तमाशा चालवतो आहे. आम्ही कधीही असे हातवारे करून नाच केला नाही. या पोरीने (गौतमी पाटील) हातवारे केले. तिला पाहायला एवढे उत्सुक असतात की मारामाऱ्या होतात. हे काय चाललंय? महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे? पुढाऱ्यांचं तर लक्ष नाही या गोष्टीकडे. यावर सगळ्यांनीच लक्ष ठेवलं पाहिजे. कुठली कला, कुठली कलावंत काय करते आहे याकडे लक्ष दिलं पाहिजे अन्यथा महाराष्ट्राचा बिहार होईल.” अशी खंत रघुवीर खेडकर यांनी बोलून दाखवली आहे. एबीपी माझाने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
कोण आहे गौतमी पाटील?
गौतमी मूळची धुळ्याची सिंदखेडा येथील आहे. १० वी पर्यंत शिक्षण घेऊन तिने आवड म्हणून डान्स शिकायला सुरुवात केली. गौतमीने पहिल्यांदा अकलूज येथील लावणी महोत्सवात बॅक आर्टिस्ट म्हणून गौतमीने सादरीकरण केले. पहिल्यांदा लावणी केल्यावर गौतमीला ५०० रुपये मानधन मिळाले होते. गौतमी सोशल मीडियावरदेखील सक्रीय असते. तिचे रिल्स कायम चर्चेत असतात.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात गौतमी पाटील म्हटलं की त्यापुढे सबसे कातील म्हटलं जातं. एवढी तिची क्रेझ आहे.. तसंच इंदुरीकर महाराजांनी तिच्याबाबत एक टिपण्णी केली होती. आमच्या किर्तनाला पाच हजारही देत नाहीत पण गौतमी पाटीलला ३ लाख रूपये मोजतात असं इंदुरीकर महाराज म्हणाले होते. त्यानंतर गौतमी पाटीलने महाराजांचा गैरसमज कुणीतरी करून दिला असावा माझं मानधन इतकं नाही. माझ्याबाबत काहीतरी समज पसरवले जातात असं म्हटलं होतं. आता रघुवीर खेडकर यांनी गौतमी पाटीलला पाच लाख रूपये मिळतात असं म्हटलं आहे. त्यावरून आता नवा वाद होण्याची शक्यता आहे.