|| दिगंबर शिंदे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील औदुंबर, मराठवाडय़ातील वेरूळ, विदर्भातील नवेगाव बांध आणि कोकणातील पोंभुर्ले ही महाराष्ट्राची नवी चार ‘पुस्तकांची गावे’ ठरणार आहेत. मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी ही माहिती ‘लोकसत्ता’ला दिली. सातारा जिल्ह्यातील भिलार

पाठोपाठ या चार गावांना हा ‘पुस्तकांचे गाव’ असा मान मिळत आहे.

वेल्स मधील ‘पुस्तकांचे गाव’ या संकल्पनेच्या धर्तीवर राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी ही योजना अमलात आणली. याअंतर्गत सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भिलार येथे राज्यातील पहिले ‘पुस्तकांचे गाव’ आकारास आले. या संकल्पनेचे मराठी भाषाप्रेमी, साहित्यिक, लेखक, पर्यटक या सर्वाकडून मोठय़ा प्रमाणात स्वागत झाल्याने आता या योजनेचा विस्तार करण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले. या नुसार पुणे महसूल विभागातून औदुंबर (जि. सांगली), औरंगाबाद विभागातून वेरूळ (जि. औरंगाबाद), नागपूर विभागातून नवेगाव बांध (जि. गोंदिया) आणि कोकण विभागातून पोंभुर्ले (जि. सिंधुदुर्ग) या चार गावांची निवड करण्यात आली आहे.

या चारही गावांना साहित्याची पार्श्वभूमी आहे. सांगली जिल्ह्यातील औदुंबरला तर सुरुवातीपासून साहित्यनगरी म्हणून सर्वत्र ओळखले जाते. कवी सुधांशू यांची कर्मभूमी आणि सदानंद साहित्य संमेलनामुळे या गावाला साहित्य जगात सुरुवातीपासूनच एक वेगळे स्थान होते. आता या योजनेमुळे औदुंबरचा लौकिक अजून वाढणार आहे. या सर्वच गावांमध्ये या योजनेअंतर्गत गावात विविध प्रकारच्या साहित्य, कथा, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवास वर्णनपर ग्रंथांनी सुसज्ज अशी भव्यदिव्य दालने उभी केली जाणार आहेत. ही रचना उभी करताना त्यामध्ये स्थानिक गावकऱ्यांचाच सहभाग घेतला जाणार आहे. यातून मराठी भाषा, साहित्याचे जतन, प्रसार आणि प्रचाराबरोबरच पर्यटनालाही मोठी चालना मिळणार असल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra four new book villages audumbar verul navegaon dam pombhurle akp
Show comments