अन्य मंडळांच्या सुमारे ३६ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी
पुणे : राज्य मंडळातर्फे होणाऱ्या अकरावीच्या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयएससीई) आदी मंडळांच्या ३६ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर एकूण १० लाख ९८ हजार ३१८ विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले आहेत.
अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जाची संख्या पाहता राज्य मंडळाच्या सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी अर्ज भरला नसल्याचे दिसून येत आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर करण्यात आला. ग्रामीण भागात अकरावीचे प्रवेश महाविद्यालय स्तरावर होणार आहेत, तर राज्यातील सहा महापालिका क्षेत्रात केंद्रीय पद्धतीने प्रवेश होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेपूर्वी राज्य मंडळातर्फे सीईटी घेतली जाणार आहे. या सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी राज्य मंडळाने २ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती.
राज्य मंडळाने जाहीर केलेल्या निकालात १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जाची संख्या पाहता सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी अर्ज भरला नसल्याचे दिसून येत आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक २ लाख ५५ हजार ६४३ अर्ज मुंबई विभागातून भरले गेले आहेत, तर सर्वात कमी २० हजार ५६६ अर्ज कोकण विभागातून भरले गेले आहेत.
मुंबई खालोखाल पुणे विभागातून १ लाख ३२ हजार २५५ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. तर २ हजार ७३४ अर्ज जुन्या विद्यार्थ्यांचे आहेत. राज्य मंडळाकडून आता परीक्षेच्या आयोजनाची तयारी सुरू करण्यात आली आहे.
स्थिती काय?
मुदतीमध्ये एकूण ११ लाख ९६ हजार ५३२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. त्यापैकी ७६ हजार ८६ विद्यार्थ्यांचा अर्ज अपूर्ण राहिला, तर २२ हजार १२८ विद्यार्थ्यांनी अर्ज भरूनही तो सादर केला नाही. तर १० लाख ९८ हजार ३१८ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केला. त्यापैकी ३५ हजार ८१४ विद्यार्थी अन्य मंडळांचे आहेत, असे माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.