दुसरीबरोबरच पहिलीच्या पुस्तकातही सुधारणा करण्याचा विचार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रसिका मुळ्ये, मुंबई</strong>

इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पाठय़पुस्तकातील संख्यावाचनावरून उद्भवलेल्या वादानंतर हे बदल तडकाफडकी मागे घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे गणित विषय समितीच्या अध्यक्षा डॉ. मंगला नारळीकर यांना डावलून हा निर्णय परस्पर रेटल्यास त्या काय भूमिका घेतील, याकडे लक्ष लागले आहे.

इयत्ता दुसरीप्रमाणेच पहिलीच्या पुस्तकातही बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे बदल करण्यास डॉ. नारळीकर यांनी विरोध केला तर काय करायचे, अशी भीती काही अधिकाऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे या बदलांबाबत त्यांना कल्पना देऊ नये, अशी तंबीही काही अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. काही अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची चर्चा समिती सदस्य आणि बालभारतीत गुरुवारी रंगली होती.

पहिली आणि दुसरीच्या गणिताच्या पुस्तकांत २१ ते ९९ हे अंक स्पष्ट करताना रूढ संख्यावाचनाबरोबरच मुलांना दशक, एकक हे स्थान स्पष्ट करणारी नवीन संख्यानामेही वापरण्यात आली आहेत. उदाहरणार्थ बावीस, पस्तीस, सेहेचाळीस.. या संख्यानामांचे स्पष्टीकरण वीस दोन – बावीस – २२, तीस पाच – पस्तीस – ३५, चाळीस सहा – सेहेचाळीस – ४६ असे देण्यात आले आहे. त्यावरून प्रचलित असलेले बावीस हे संख्यावाचन बदलून ते वीस दोन अशा प्रकारे होणार असल्याच्या समजातून वाद निर्माण झाला.

संख्यावाचन बदलांबाबत सुरू असलेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर कोणत्या माध्यमाच्या पुस्तकांमध्ये बदल करणे आवश्यक आहे याचा आढावा बालभारतीने घेतला. त्यानुसार तीन दाक्षिणात्य भाषा आणि उर्दू यांमध्ये बदल न करता मराठी, हिंदी, गुजराथी भाषा माध्यमाच्या पुस्तकांतून संख्यांचे आकलन होण्यासाठी देण्यात आलेले ‘वीस दोन’ अशा स्वरूपातील स्पष्टीकरण काढून टाकण्याबाबत चर्चा झाली. बालभारतीच्या पुस्तकांमध्ये चुका झाल्यास त्याबाबत सुधारित मजकूर ‘शिक्षण संक्रमण’ या नियतकालिकामधून आणि जोड पुस्तिकांच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येतो. त्यानुसार यंदाच्या दुसरीच्या पुस्तकांबरोबरच गेल्या वर्षीच बदललेल्या पहिलीच्या पुस्तकांमध्येही बदल करता येईल का, याची चाचपणी बालभारतीने केली आहे.

याबाबत बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. पाठवण्यात आलेल्या संदेशालाही त्यांनी उत्तर दिले नाही. ‘गणिताच्या पुस्तकांमध्ये कोणत्या पानावर नेमके काय आहे याचा आढावा हा वाद निर्माण झाला त्यानंतर घेण्यात आला होता. मात्र नव्याने काही छपाई करण्याबाबत अद्याप सूचना नाही,’ असे निर्मिती विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

तज्ज्ञांच्या समितीकडून पडताळणी 

इयत्ता दुसरीच्या बालभारतीच्या पुस्तकात संख्यावाचनातील बदल मुलांची अध्ययन क्षमता वाढीस लागावी म्हणून करण्यात आला आहे. ही संख्यानामे बदलली गेली नसून केवळ संख्येची फोड देण्यात आली आहे. तरीही सभागृहाची या बदलावर भावना तीव्र असल्यास तज्ज्ञांची समिती नेमून या बदलाची पडताळणी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

पुस्तकांमध्ये काही बदल होत असल्यास मला त्याची कल्पना देण्यात आलेली नाही. मात्र, कल्पना देऊन अथवा न देता बदल झाल्यास मी अभ्यास मंडळावर काम करणार नाही. अभ्यास मंडळावर काम करण्यात माझा कोणताही राजकीय हेतू नाही, नाव मिळावे म्हणूनही मी काम करीत नाही आणि मानधनही घेत नाही. माझ्या नातवंडांना गणित अधिक सोपे, चांगल्या पद्धतीने कसे शिकवता यावे यासाठी मी प्रयत्न करते. मात्र माझ्याशी मतभेद असल्यास अशा मंडळावर काम करण्यापेक्षा मी राजीनामा देईन.

– डॉ. मंगला नारळीकर, अध्यक्ष, गणित विषय समिती, बालभारती

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government 2nd standard maths 2nd std mathematics zws