रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील बारसु येथील रिफायनरीसाठी २ हजार ९०० एकर आणि नाटे येथे क्रूड टर्मिनल्ससाठी आवश्यक पाचशे एकर, अशी एकूण ३ हजार ४०० एकर जागा महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या ताब्यात आली असून रिफायनरी प्रकल्पासाठीच्या चाचण्यांना काही लोकांनी परवानगी दिली आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
तालुक्यातील उर्वरित ग्रामस्थांनाही प्रकल्पाचे फायदे समजावून सांगण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचेही स्पष्ट करून ते म्हणाले की, बेरोजगारांना काम द्यायचे असेल तर रिफायनरी अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे बारसू रिफायनरीबाबतची भूमिका शेतकऱ्यांना पटवून दिली जाणार आहे. चाचण्या करण्यासाठी ८४ ठिकाणी कूपनलिका खोदायच्या आहेत. त्यापैकी काहींना परवानगी मिळालेली आहे. नाटे येथे क्रूड टर्मिनलसाठी साठी ५०१ एकर जमीन लागणार आहे. त्या सर्व जमिनींची संमती पत्रे मिळालेली आहेत. तेथे कूपनलिका खोदाईचे काम शंभर टक्के पूर्ण झालेले आहे. उर्वरित ठिकाणी २८ लोकांनी संमती दिलेली आहे. मात्र यासंदर्भात काही लोक गैरसमज पसरवत आहेत. आत्तापर्यंत बारसू येथेही सुमारे २ हजार ९०० एकर जागा एमआयडीसीच्या ताब्यात आलेली असून प्रकल्पासाठीची निम्मी जागा आमच्याकडे आहे.
आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी समर्थनाच्या घेतलेल्या भूमिकेवरून विरोधकांनी त्यांच्या पोस्टरला शेण फासल्यानंतर साळवी यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी पुढे आली होती, याबाबत मंत्री उदय सामंत यांना विचारले असता मंत्री उदय सामंत म्हणाले, आमदार राजन साळवी यांनी जी रिफायनरी समर्थनाची भूमिका घेतलेली आहे, त्यासाठी कोणाच्याही शिफारशीची आवश्यकता नाही. त्यांचे संरक्षण वाढवण्यात आलेले आहे. रिफायनरीसाठी साळवींनी घेतलेला पुढाकार ही कौतुकास्पद बाब आहे. शासनाचे त्यांनी समर्थन केले आहे, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. राज्यात मध्यावधी निवडणुकांचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मत नोंदवून सामंत म्हणाले की, बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युतीचा मिळून आकडा १८२ वर जाण्याची शक्यता आहे. दोन वर्षांनंतर विधानसभा निवडणूक होईल तेव्हा परत एकदा बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचे सरकार महाराष्ट्रात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातील राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन कोणीही केलेले नाही. राज्यपालांच्या वक्तव्याचे आम्ही समर्थन केले असते तर विरोधकांच्या टीकेला उत्तर देणं योग्य ठरले असते, असे सामंत यांनी या विषयावर बोलताना स्पष्ट केले.