मुंबईत गिरणी कामगारांच्या मेणबत्ती मोर्चाप्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १२ गिरणीच्या जागेत दिवाळीनंतर घरबांधणी करणार असल्याची ग्वाही दिल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार संघाचे अध्यक्ष दिनकर मसगे यांनी दिली.
मुंबईत एमएमआरडी ५० टक्केघरे गिरणी कामगार व वारसांना देण्यात येतील. त्याचा जीआर महिन्याभरात काढला जाईल, तसेच मुंबईतील १२ गिरण्यांच्या जागेत दिवाळीनंतर घरबांधणी करण्यात येईल. एनटीसीच्या चार गिरण्यांबाबतही निर्णय होण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले होते.
गिरणी कामगारांच्या काही संघटनांनी एकत्रित येऊन स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मेणबत्ती मोर्चा काढला होता, तसेच स्वातंत्र्यदिनी कार्यक्रम ठेवण्यात आला होता. सिंधुदुर्गातून दिनकर मसगे यांच्या नेतृत्वाखाली सेक्रेटरी श्यामसुंदर कुंभार, जयश्री सावंत, लॉरेन्स डिसोझा, सुभाष परब, रामचंद्र कोठावळे आदींसह शेकडो गिरणी कामगार, त्यांचे वारस मोर्चात सामील झालेले होते.
मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासने प्रत्यक्षात साकारल्यास गिरणी कामगार, त्यांचे वारसांना मोठा दिलासा मिळणारा आहे, असे दिनकर मसगे म्हणाले. मेणबत्ती मोर्चाचे हे फलित आहे. त्यामुळे मोर्चाबाबत अन्य संघटनांनी केलेल्या टीकेला अर्थ नाही, असेही मसगे म्हणाले.
येत्या दिवाळीनंतर बारा गिरणीच्या जागेत घरबांधणीस सुरुवात करण्याची ग्वाही, तसेच एमएमआरडीच्या घरबांधणीत ५० टक्केघरे गिरणी कामगारांना देण्याचा जीआर महिन्यात काढला जाईल, या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाने गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न सुटण्यास दिलासा मिळाला आहे, असे दिनकर मसगे म्हणाले.

Story img Loader