करोनाच्या पार्श्वभूमीवर होळी आणि धुळवडीवर घालण्यात आलेले निर्बंध राज्य सरकारने मागे घेतले आहेत. राज्य सरकारने होळी रात्री १० च्या आत पेटवण्याचं बंधन घातलं होतं. तसंच परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी डिजेबरोबरच मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यासही बंदी घालण्यात आली होती. यानंतर विरोधकांसह सर्वसामान्यांकडून नाराजी जाहीर करण्यात आली होती. यानंतर राज्य सरकारने अखेर हे निर्बंध मागे घेतले आहेत. यामुळे यंदा निर्बंधमुक्त होळी, धुळवड साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद गृहविभागाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक नियमावलीत करण्यात आली होती. राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना ही नियमावली पाठवत या काटेकोर पालन करण्याचा आदेश देण्यात आला होते. दरम्यान राज्य सरकारने अनेक निर्बंध मागे घेतले असून त्यासंबंधीची नियमावली नव्याने जाहीर करण्यात आले आहेत.
गृह विभागाने करोनाच्या नियमांचं पालन करावं तसंच कमीत कमी गर्दी करुन होळी सण साजरा करावा असं आवाहन केलं आहे. रंग लावणं टाळावं असंही सांगण्यात आलं आहे. शिमगा साजरा करत असताना पालखीची मिरवणूक घरोघरी न नेता मंदिरात नेली जावी अशी सूचना देण्यात आली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे वेळेचं बंधन काढून टाकण्यात आलं आहे. नियमात कोणतेही बदल करण्यात आले नसल्याचं स्पष्टीकरणही गृह विभागाने दिलं आहे.
भाजपा आमदार राम कदम यांनी या निर्बंधांवरुन संताप व्यक्त केला होता. महाराष्ट्र सरकारचा हिंदू सणांना इतका टोकाचा विरोध का? अशी विचारणा त्यांनी केली होती. तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात; आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच असा इशाराही यावेळी त्यांनी दिली होता. दरम्यान सरकारने निर्बंध मागे घेतल्यानंतर त्यांनी स्वागत केलं असून इतक्या उशीरा शहाणपण सुचलं असा टोलाही लगावला आहे.
राम कदम ट्वीटमध्ये काय म्हणाले होते?
“महाराष्ट्र सरकारचा एवढा टोकाचा हिंदू सणांना विरोध का? आता पुन्हा त्यांनी होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यावर निर्बंध घातलेत आहो तुम्ही घाबरत असाल.. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आम्हाला कळते स्वतःची कशी काळजी घ्यायची. तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात. तुमच्याच भाषेत काय उखाडायचे ते उखाडा. आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच,” असं राम कदम ट्वीटमध्ये म्हणाले होते.
गृहखात्याने जारी केलेले नियम काय होते?
रात्री १० वाजताच्या आत होळी पेटवणे बंधनकारक
होळीदरम्यान डीजे लावण्यावर कायदेशीर बंदी.
दहावी तसेच बारावी वर्गाच्या परीक्षा सुरु असल्यामुळे लाऊडस्पीकरचा आवाज मोठा केल्यास कारवाई
होळी साजरी करताना मद्यपान तसेच बिभत्स वर्तन केल्यास कारवाई
होळी खेळताना महिला तसेच मुलींनी खबरदारी घेण्याचे आवाहन.
कोणत्याही जातीधर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये
धुलीवंदनाच्या दिवशी जबरदस्तीने रंग लावू नये, पाण्याचे फुगे फेकू नयेत.