राज्यात सध्या सुरू असलेल्या लसीच्या तुटवड्याच्या वादावरून भाजपाचे नगर जिल्ह्यातले नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. “मंत्र्यांना सध्या मुख्यमंत्र्यांनी एकच काम दिलंय. केंद्रावर आरोप करा आणि आपलं पाप झाका. राज्यातील जनतेला आज वाऱ्यावर सोडल्याची भावना झाली आहे”, असं विखे पाटील म्हणाले आहेत. “आता केंद्रावर बोट दाखवण्यापेक्षा रेमडेसिवीर, ऑक्सिजन उपलब्ध करा. प्रत्येक मंत्र्याला आपापल्या मतदारसंघात २०० बेडचं कोविड रुग्णालय उभारायला सांगा. फक्त फेसबुकवर संवाद साधून तुम्ही जनतेचं समाधान करू शकणार नाही”, असा टोला देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

लस पुरवठ्यावरूनही सरकारवर आरोप

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर आरोप केले आहेत. “इतक्या मोठ्या प्रमाणावर राज्याला व्हॅक्सिन मिळालं. पण त्याचं नियोजन राज्य सरकार करू शकलं नाही. तो नियोजनशून्य कारभार झाकण्यासाठी किंवा लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. आपण केंद्राकडे बोट दाखवतोय. पण हजारो रुग्ण आज हॉस्पिटलमध्ये आहेत. हजारो रुग्णांना बेड मिळत नाहीयेत. नगरमध्ये रेमडेसिवीर मिळत नाहीयेत, आरोग्य सेवा उपलब्ध नाहीत”, असं ते म्हणाले. एका खासगी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

लसपुरवठ्यावरून आरोप-प्रत्यारोप

गेल्या काही दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी करोना लसीच्या डोसचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचं देखील चित्र दिसत असून राज्याला पुरेसे लसीचे डोस मिळावेत, अशी मागणी राज्य सरकारकडून केली जात आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून पुरेसे लसीचे डोस दिले जात असल्याचा दावा केला जात आहे.

“नगरचे पालकमंत्री पाहुण्यासारखे येतात”

यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना खोचक टोला लगावला. “नगर जिल्ह्यात ४ मंत्री आहेत. इथले पालकमंत्री पाहुण्यासारखे येतात. त्यांच्या स्वत:च्या तालुक्यात ते एकही कोविड रुग्णालय सुरू करू शकलेले नाहीत. सगळं खासगी रुग्णालयांच्या भरवश्यावर सोडलंय. जिल्ह्यातले ३ -३ मंत्री करतात काय?”, असा सवाल विखे पाटील यांनी केला आहे.

Story img Loader