शिर्डी व शनिशिंगणापूर येथील सुरक्षा व्यवस्था केंद्रीय राखीव पोलीस दलाकडे (सीआरपीएफ) सोपविण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठविला असून त्यास लवकरच मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे आता या देवस्थानांच्या सुरक्षेचा स्थानिक पोलिसांवरील ताण कमी होणार आहे. शिर्डी व शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी देश-विदेशातून भाविक मोठय़ा संख्येने येत असतात. शिर्डी येथे दररोज सरासरी ५० ते ६० हजार भाविक तर शनिशिंगणापूर येथे २५ ते ३० हजार भाविक येतात. यात्रा व उत्सवाच्या काळात दिवसाला पाच ते दहा लाख भाविक हजेरी लावतात. त्यांच्या सुरक्षेसाठी अत्यंत अपुरे मनुष्यबळ पोलिसांकडे आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा ताण संपूर्ण नगर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेवर पडतो. एक वर्षांपूर्वी गुप्तचर यंत्रणांनी दहशतवाद्यांकडून या दोन्ही देवस्थानांना धोका असल्याचा अहवाल दिला होता. नगरचे पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी दोन्ही देवस्थानांना सीआरपीएफची सुरक्षा व्यवस्था देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. तो आता केंद्राकडे पाठविण्यात आला असून दोन, तीन महिन्यात सीआरपीएफकडे सुरक्षा व्यवस्था जाणार आहे. बिहारमधील बोधगया येथील साखळी बाँम्बस्फोटानंतर दोन्ही देवस्थानांच्या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मंदिरात व परिसरात मोबाईल, कॅमेरे, बॅगा व अन्य वस्तू नेण्यास मनाई करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी येणाऱ्या वाहनांची नाकाबंदी करून तपासणी केली जात आहे. दोन्ही देवस्थानच्या सुरक्षा यंत्रणेला पाच दिवसांचे प्रशिक्षण देण्यास प्रारंभ झाला आहे. सुरक्षेबरोबरच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे शिक्षण त्यांना दिले जात आहे.

Story img Loader