यवतमाळमध्ये शेतामध्ये कीटकनाशक फवारणीवेळी झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारने केली आहे. राज्य सरकारकडून गुरूवारी केंद्राला यासंदर्भात पत्र पाठवले. यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे २३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण राज्यभरात प्रचंड गाजले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यामध्ये जातीने लक्ष घालून दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सरकारच्या आदेशानंतरही बंदी असलेले कीटकनाशक विकणारे विक्रेते आणि कीटकनाशक तयार करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा. शेतकऱ्यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत असलेल्या कंपन्या आणि विक्रेत्यांवर दया माया दाखवू नका, असे कठोर आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले होते.
यवतमाळमधील शेतकऱ्यांच्या मृत्यूसाठी कृषी मंत्रालय जबाबदार : शरद पवार
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या मृत्यूसाठी राज्य सरकार आणि कृषी विभागाला जबाबदार धरले होते. आघाडी सरकारच्या काळात फवारणीवेळी एकाही शेतकऱ्याचा मृत्यू झाला नव्हता. राज्यात कीटकनाशकसंबंधी स्वतंत्र संस्था आणि कायदा अस्तित्वात आहे. कीटकनाशकाच्या विक्री आणि नियंत्रणाकरता या संस्था अस्तित्वात असून त्यांच्या संमतीशिवाय कोणत्याही कीटकनाशकाची विक्री शक्य नसते. त्यामुळे बाजारात अप्रमाणित कीटकनाशक येत असेल तर त्यासाठी कृषी मंत्रालय जबाबदार असल्याची टीका पवार यांनी केली.
बंदी असलेले कीटकनाशक विकणाऱ्यांवर आणि कंपनीवर गुन्हे दाखल करा : मुख्यमंत्री