मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषा विभागाची सूत्रे स्वीकारल्यापासून राज्यातील छोटय़ा साहित्य संमेलनांना सुगीचे दिवस आले आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने २४ संमेलनांना अर्थसाहाय्य पुरवून आयोजकांनाही लखपती केले आहे. मंडळाने २०११-१२ या आर्थिक वर्षांत दहा संमेलनांच्या आयोजकांना प्रत्येकी दोन लाख रुपये दिले, तर २०१२-१३ या आर्थिक वर्षांत १४ संमेलनांना प्रत्येकी ३ लाख ५७ हजार १४० रुपये अर्थसाहाय्य देऊ केले आहे. विशेष म्हणजे २०११-१२मधील नऊ संमेलनांना पुन्हा २०१२-१३मध्ये अर्थसाहाय्य करण्यात आले. मात्र, संमेलनांच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावणारे अर्थसाहाय्य मिळाल्याचे अमान्य करीत आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अथवा विश्वधर्म साहित्य संमेलनाच्या तुलनेत या २४ छोटय़ा संमेलनांना कमी अर्थसाहाय्य मिळाले असले तरी त्याची वाच्यता किंवा शासनाप्रती कृतज्ञता कोठे वाचावयास किंवा ऐकावयास मिळाली नाही, असे मत बुलढाण्यातील लेखक नरेंद्र लांजेवार यांनी व्यक्त केले आहे. त्यांनीच माहिती कायद्यांतर्गत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाला विचारलेल्या माहितीमुळे ही बाब समोर आली.
आर्थिक वर्ष २०११-१२मध्ये औदुंबरचे सदानंद साहित्य महामंडळ, मुंबईची मराठी विज्ञान परिषद, पुण्याचे अक्षर मानव, दादरचे दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, नांदेड जिल्ह्य़ातील कुंटुरचे साने गुरुजी संस्कारमाला सार्वजनिक वाचनालय, औरंगाबादचे कै. धोंडीराम माने विकास प्रबोधिनी, औरंगाबादचे अस्मितादर्श, अकोल्याचे अंकुर साहित्य संघ, मुंबईचे गजल सागर प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था अशा १० संस्थांना प्रत्येकी दोन लाख रुपये असे एकूण २० लाख रुपये अनुदान सरकारने दिल्याचे मंडळाचे म्हणणे आहे.
त्याचबरोबर २०१२-१३ या आर्थिक वर्षांत आधीच्या वर्षांतील औरंगाबादचे अस्मितादर्श वगळता नऊ संस्थांना पुन्हा अर्थसाहाय्य करण्यात आले. यात औरंगाबादचे प्रागतिक विचार संसद, नागपूरचे कॉ. अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन, सांगली विटाचे भारतमाता ज्ञानपीठ, रत्नागिरी जिल्ह्य़ातील मालगुंडचे केशवसुत स्मारक समिती आणि रायगड जिल्ह्य़ातील वडघरचे सानेगुरुजी आंतरभारती अनुवाद केंद्र अशा पाच आणि एकूण १४ छोटय़ा साहित्य संमेलनांना सुमारे साडेतीन लाख रुपये मिळाले. या दोन्ही आर्थिक वर्षांतील सर्व निधी वितरित करण्यात आला असल्याचे मंडळाचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी नागपुरात पार पडलेल्या कॉ. अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे संयोजक नेताजी राजगडकर यांनी एक छदामही न मिळाल्याचे म्हटले असून, उलट गेल्या वर्षीच्या संमेलनामुळे आर्थिक कंबरडे मोडल्याची प्रतिक्रिया ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.
याच संमेलनात महत्त्वाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ कवी डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनाही असे काही अर्थसाहाय्य मिळाल्याची माहिती नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा