Maharashtra Breaking News Highlights : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन लवकरच सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्ताराला वेग आला आहे. आज महायुतीचे नेते दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन मंत्रिमंडळाच्या यादीवर अंतिम मोहोर उमटविणार असल्याची माहिती मिळत आहे. १४ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते शरद पवार यांचा वाढदिवस असल्यामुळे अजित पवार यांनी सहकुटुंब आणि पक्षातील काही नेत्यांसह शरद पवारांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते विविध पक्षातील नेत्यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Maharashtra Political News Updates | महाराष्ट्र न्यूज अपडेट्स
सूरत - चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ धाराशिव जिल्ह्यातून जात आहे. या महामार्गासाठी भूसंपादन करताना अतिशय किरकोळ मावेजा (जमिनीचा वाढीव मोबदला) मिळत असल्याचा प्रश्न धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेत मराठीतून विचारला. यावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मराठीत उत्तर देतान म्हटले की, या मागणीवर जरूर विचार केला जाईल.
https://twitter.com/OmRajenimbalkr/status/1867188154056548408
भ्रमणध्वनी वादात महिलेचा सासऱ्यावर चाकू हल्ला
नाशिक - भ्रमणध्वनीवरून आई आणि मुलगा यांच्यात झालेल्या वादाचे पर्यावसान सुनेने सासऱ्यावर चाकू हल्ल्यात झाले. यात ६८ वर्षीय व्यक्ती जखमी झाली.
भाभानगरमधील हिरवेनगर येथील हरी बाहर सोसायटीजवळ ही घटना घडली. याबाबत अनिल रोकडे (६८) यांनी तक्रार दिली. राणी रोकडे असे संशयितेचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हिरवेनगरात रोकडे कुटूंबियांचे घर आहे. वृद्ध सासरे घरात असताना सून राणी आणि तिचा मुलगा आर्य यांच्यात भ्रमणध्वनीवरून भांडण सुरू होते. यावेळी सुनेच्या आईने तुझे सासरे या ठिकाणी आल्याने तुझा मुलगा वाद घालत असल्याचे सांगत अनिल रोकडे यांचा चार्जिंगला लावलेला भ्रमणध्वनी काढून घेतला. आपला भ्रमणध्वनी घेण्यासाठी रोकडे गेले असता सुनेने त्यांच्या पाठीवर चाकू मारून दुखापत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या हल्ल्यात रोकडे हे जखमी झाले. या प्रकरणी संशयित सुनेविरुद्ध मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sharad Pawar Birthday: मोठी बातमी! अमित शाह यांनीही घेतली शरद पवारांची भेट, भाजपा नेते म्हणतात, 'पवार आले तर आनंद'
शरद पवार यांचा आज ८५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी शरद पवार यांची सहकुटुंब आणि पक्षाच्या नेत्यांसह भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. आता अमित शाह हे शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. आज वाढदिवस असल्यामुळे ही भेट झाली असावी, असा अंदाज काढला जात आहे. मात्र भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, जर शरद पवार महायुतीत येत असतील तर त्याचा आम्हाला आनंदच होईल.
पुणे: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
पुणे: तरुणावर हल्ला करुन खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात मोक्का कारवाईनंतर सहा महिने फरारी झालेल्या आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी कर्नाटकातील रायचूर येथून ताब्यात घेत अटक केली आहे. सौरभ तिमप्पा धनगर (वय २४, रा. ताडीवाला रस्ता) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
"एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही," विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ उरले नाही. जे मिळेल ते घ्या नाहीतर घरी विश्रांती करा, अशी स्थिती भाजपने सरकारने या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची करून ठेवली आहे, असा टोला माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला. सविस्तर वाचा…
चेंबूरमध्ये पालिकेने खोदलेल्या खड्यात पडून इसमाचा मृत्यू, कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल
मुंबई : मलनि:सारण वाहिनीसाठी खोदलेल्या खड्यात पडून एका ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी चेंबूरच्या टिळक नगर परिसरात घडली आहे. याबाबत टिळक नगर पोलिसांनी संबंधित पालिकेच्या कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
पिंपरी- चिंचवड : देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यात जातीय तणाव निर्माण केला जातो. षड्यंत्र रचलं जातं. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. असं मत माजी खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केलं आहे.
मद्य दुकानासाठी प्रार्थनास्थळ हटविण्याचा प्रयत्न, युवासेनेची निदर्शने
नाशिक : सातपूर आयआयटी सिग्नलजवळील नाईस संकुलमध्ये नव्याने सुरू झालेल्या मद्य दुकानासाठी या परिसरातील पुरातन प्रार्थनास्थळ हटविण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची तक्रार करत युवा सेनेच्यावतीने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
कुर्ला बस अपघात: मृत महिलेचे दागिने चोरणाऱ्याविरोधात अखेर गुन्हा दाखल
मुंबई : कुर्ला बस अपघातातील मृतांपैकी एका महिलेच्या अंगावरील दागिने चोरी झाल्याचा गंभीर प्रकार घडला होता. एक हेल्मेट घातलेली व्यक्ती मृत महिलेच्या हातातून सोन्याच्या बांगड्या चोरत असल्याचे चित्रीकरण प्रसारित झाले आहे. सध्या ती ध्वनिचित्रफीत चर्चेचा विषय ठरली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.
Maharashtra News Live: अजित पवार यांनी घेतली अमित शाह यांची भेट; खातेवाटपावर चर्चा?
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज खासदार सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. मागच्या आठवड्यात अमित शाह यांची भेट राहिली होती. पण आज अजित पवार यांची भेट झाल्यामुळे त्यांची खातेवाटपावर चर्चा झाली का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
पंतप्रधान मोदी देशभरातील मुख्य सचिवांशी साधणार दोन दिवस संवाद
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील विविध राज्यांचे मुख्य सचिव आणि सचिवांना योगाभ्यासाचे धडे शिकवणार आहेत. तसेच या अधिकाऱ्यांसमवेत देश- राज्यातील विविध विषयांवर चर्चाही करणार आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात शासकीय वसतिगृहातील २२ मुलींना विषबाधा
नंदुरबार : नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा झाली. मळमळ व उलटीचा त्रास जाणवणाऱ्या मुलींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डोंबिवलीत काँक्रीट रस्ते काम करताना जलवाहिनी फुटली; पी. पी. चेंबर्सजवळ शेकडो लीटर पाणी वाया
डोंबिवली येथील पूर्व भागात भगतसिंग रस्त्यावर पी. पी. चेंबर्स माॅल ते सुयोग हाॅल दरम्यान रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या कामातील पहिल्या टप्प्यासाठी पी. पी. चेंबर्स माॅल ते सारस्वत बँक दरम्यान रस्ता ठेकेदाराकडून खोदण्यात येत आहे. हे काम करताना गुरूवारी या रस्त्यालगतची पालिकेची मुख्य जलवाहिनी फुटली.
उधारीवर कोंबडी न दिल्याने तळोजात चाकूचा वार
पनवेल ः तळोजा परिसरात बुधवारी सकाळी नऊ वाजता एका चिकन विक्रेत्याकडे उधारीवर कोंबडी न दिल्याने ग्राहकाने चिकन विक्रेत्याच्या हातावर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. याबाबत तळोजा पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा संबंधित ग्राहकाविरोधात नोंदविण्यात आला आहे. तळोजा गावात राहणारा ४० वर्षीय बिलाल पटेल बुधवारी सकाळी मोहम्मद शहीद हमीद खान यांच्या स्टार कोंबडी विक्रीच्या दूकानावर कोंबडी खरेदीसाठी गेला होता. यावेळी मोहम्मद शहीद यांचा १७ वर्षांचा मुलगा शहेनशहा तेथे होता. बिलाल याने उधारीवर कोंबडीची मागणी केली मात्र कोंबडी विक्रेत्यांनी देण्यास नकार दिला. बिलाल याने मोहम्मद शहीद यांना शिविगाळ करुन धक्काबुक्की केली. मोहम्मद याचा मुलगा भांडण सोडविण्यासाठी गेला असता बिलाल त्याच्या हातावर चाकूचा वार केला.
Sharad Pawar Birthday: “मंदिराच्या चाव्या पुजाऱ्याच्या हातात गेल्यानं, विठ्ठलाचं…”, बारामतीमधील बॅनरमुळे चर्चांना उधाण
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांचा आज ८५ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुटुंबासह त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी बारामतीमध्ये लागलेल्या एका बॅनरने लक्ष वेधले आहे. "मंदिराच्या चाव्या पुजाऱ्याच्या हातात गेल्यानं, विठ्ठलाचं महत्त्व कमी होत नाही", असा संदेश या बॅनरवर लावलेला आहे. हा बॅनर साहेबप्रेमी बारामतीकर या नावाने लावण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरील पकड सिद्ध केल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर आता या बॅनरची चर्चा होऊ लागली आहे.
‘एनआयए’ची अमरावतीत छापेमारी; संशयित युवक ताब्यात, पाकिस्तान कनेक्शन….
अमरावती : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अमरावती शहरातील छायानगर परिसरात छापेमारी केली आहे. या ठिकाणाहून एका संशयित युवकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. या युवकाला राजापेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.
खारघरमध्ये बँकेतून रोख रक्कम नेणाऱ्यांची लूट
पनवेल : खारघर उपनगरातील बँकेतून रोख रक्कम घेऊन घरी जाणाऱ्या ग्राहकांना लुटण्याच्या दोन घटना महिन्याभरात घडल्या. यामुळे चोरट्यांनी बँक ग्राहकांना लक्ष्य केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
‘रामगिरी’ला ‘देवा’भाऊची प्रतीक्षा; आता लवकर या…
नागपूर : राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड होऊन त्यांनी शपथही घेतली. आता प्रतीक्षा आहे त्यांच्या नागपूर आगमनाची. ते नागपुरात येणार म्हणून शासकीय निवासस्थान ‘रामगिरी’ सज्ज ठेवण्यात आले आहे. तेथील कर्मचारी फडणवीस साहेब येणार म्हणून आनंदी आहेत.
कोळी बांधवांची घरे कायम करणार; आमदार मंदा म्हात्रे यांचे पत्रकार परिषदेत आश्वासन
नवी मुंबई : कोळीवाड्यातील कोळी बांधवांची घरे व जागा कायमस्वरूपी नसल्याने घरांची पुनर्बाधणी करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कोळी बांधवांच्या घरांचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती बेलापूरचे आमदार मंदा मात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नवी मुंबई शहरात आणि कोळी बांधव राहत असून नवी मुंबई महापालिका व सिडको यांच्यामार्फत कोळी बांधवांच्या घरांवर तोडक कारवाई केली जाते. त्यामुळे घरांची पुनर्बांधणी करताना नाहक त्रास होत आहे. ही घरे व जागा कायमस्वरूपी करणे संदर्भात कोळी बांधव व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्याचीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
कोळी बांधव व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक लावून नियमावलीच्या कायद्याच्या चौकटीत बसवून किचकट नियमांमधून सुटका करत हा प्रश्न कसा मार्गी लावता येईल व कोळी बांधवांना कसा योग्य तो न्याय देण्यात येईल याकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले आहे. स्थानिक कोळी बांधवांना त्यांची हक्काची घरे मिळवून देणार असल्याचा विश्वास म्हात्रे यांनी व्यक्त केला.
अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना अटक
पनवेल : कळंबोली उपनगरातील सेक्टर १७ येथे सायंकाळी साडेसहा वाजता पोलिसांनी सापळा रचून दोन तरुणांकडून ३ लाख ९६ हजारांच्या रोख रकमेसह पावणेतीन लाख रुपये किमतीचा हेरॉईन हा अमली पदार्थ जप्त केला. या तरुणांची मोठी टोळी कळंबोलीत नशेच्या पदार्थांची विक्री करत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. नवी मुंबई पोलीस दलाचे अंमलीपदार्थ विरोधी कक्ष आणि कळंबोली पोलीस यांच्या संयुक्त पथकाने रोडपाली परिसरातील सेक्टर १७ येथे सोमवारी सायंकाळी सापळा रचला होता. एक तरुण येथे अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक संदीप निगडे यांना मिळाली होती. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक उमेश थिटे यांच्यासोबत अमली पदार्थ विरोधी कक्षाचे संयुक्त पथक स्थापन करुन रोडपाली परिसरात एका कॅफे दुकानासमोर हा सापळा रचण्यात आला. सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता हा तरुण तेथे आल्यावर त्याच्याकडून ६.६३ ग्रॅम वजनाचा हेरॉईन हा अंमलीपदार्थ आणि १७ कफ सिरफच्या बाटल्या सापडल्या. तसेच ३ लाख ९६ हजार रोख या तरुणाकडे सापडले. हा तरुण याच परिसरातील त्याच्या साथीदारासह अजून काही तरुणांना हे अंमली पदार्थ देण्यासाठी आला होता.
उद्याने बकाल; सुरक्षा धोक्यात; महानगरपालिकेच्या अनास्थेमुळे नवी मुंबई शहरातील उद्यानांची दुरवस्था
नवी मुंबई शहरात जवळजवळ २०० सार्वजनिक उद्याने आहेत. सर्वात जास्त उद्याने ही नेरुळ व बेलापूर विभागात आहे शहरातील उद्यानात पालिकेच्या दुर्लक्षामुळे बालगोपाळांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सविस्तर वाचा…
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या पुण्याच्या वर्तुळाकार मार्गासाठी (रिंग रोड) पूर्व आणि पश्चिम भागातील २०० हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन बाकी असून, त्यासाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे केली आहे. सविस्तर वाचा…
पडळकरांच्या टीकेला विरोध करायला हवा होता; युतीतील राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांची अपेक्षा
‘भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने त्याला विरोध करायला हवा होता,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. सविस्तर वाचा…
सोलापूर : यंदा गणेशोत्सवात ‘लोकसत्ता’ने ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमांतर्गत सोलापूरजवळील प्रार्थना फाउंडेशन संस्थेच्या कार्याची ओळख करून दिल्यानंतर वाचकांनी या संस्थेला भरभरून आर्थिक हातभार लावला. त्यापाठोपाठ सोलापूरच्या अरविंद किणीकर यांनी आपल्या दिवंगत पत्नी सुजाता किणीकर यांच्या स्मरणार्थ प्रार्थना फाउंडेशनला नवीन अद्ययावत रुग्णवाहिका भेट दिली. या रुग्णवाहिकेचा उपयोग संस्था संचलित 'प्रार्थना बालग्राम' प्रकल्पातील मुले आणि वृद्धांसाठी होणार आहे.
Maharashtra News Live: देवेंद्र फडणवीस, अजित पवार दिल्लीत असताना एकनाथ शिंदे का नाही आले? फडणवीस म्हणाले…
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवारांनी आज सकाळी शरद पवारांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी आणि राजनाथ सिंह यांची भेट घेतली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आज दिल्लीत खलबतं होणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे मात्र दिल्लीत नाहीत. ते दिल्लीत का नाही आले? यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.
'टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत'…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
भंडारा : " आमच्या सरपंच बाई आणि इतर महिलांना रात्रीच्या वेळीच भलते सलते उद्योग सुचतात, उठ सुठ झाडूच लावायचा, कचरा साफ करायचा, रात्री मीटिंग काय घ्यायच्या, नको ते सोंग करायचे' अशा बोचऱ्या टीका माझ्यावर केल्या जात होत्या. पण कुणालाही प्रतिउत्तर न देता मी माझे काम सुरू ठेवले. मात्र माझ्या कामावर हसणारे आणि मला मुर्खात काढणारे लोकं आज माझ्यावर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत आणि बेला ग्रामपंचायतीला सलाम ठोकत आहेत.
दोन कोटींच्या खंडणीची मागणी; वाल्मीक कराडांसह तिघांवर केजमध्ये गुन्हा
छत्रपती संभाजीनगर : पवन ऊर्जा क्षेत्रातील अवादा एनर्जी कंपनीचे केज तालुक्यात होत असलेले काम बंद करा, काम सुरू ठेवायचे असेल तर दोन कोटी रुपये द्या, अन्यथा हात-पाय तोडू, अशी धमकी दिल्याप्रकरणी परळीचे वाल्मीक कराड, विष्णू चाटे व सुदर्शन घुले यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रायगड किल्ल्या संदर्भात महत्त्वाची अपडेट… पाचाड येथील शिवसृष्टी उभारणीच्या प्रकल्पाला गती
अलिबाग : किल्ले रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्याच्या प्रकल्पाला गती मिळणार आहे. प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून तो मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. राज्यसरकारच्या मंजूरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे.
येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार
येरवड्यातील खुल्या काारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पसार झालेल्या कैद्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा