Maharashtra Government Formation : राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, सत्ता स्थापनेसाठी शपथविधीचा सोहळाही ठरला. शपथविधीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाणही ठरलं. पण या दिवशी कोण कोणत्या पदाची शपथ घेणार? मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर कोण बसणार? याबाबत अधिकृत खुलासा झालेला नाही. एकीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री यांची प्रकृती बिघडली असल्याने त्यांनी सर्व बैठका रद्द केल्या आहेत. तर दुसरीकडे अजित पवार चर्चेकरता दिल्लीत गेले आहेत. दरम्यान, ४ डिसेंबरला भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत भाजपाचा विधिमंडळ नेता निवडला जाणार आहे. पीटीआयच्या हवाल्याने टाईम्स नाऊने हे वृत्त दिलं आहे.

राज्यात पुढचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आलंय. मात्र, महायुतीतील अंतर्गत वादामुळे हे नाव जाहीर करण्यास उशीर केला जातोय. सत्ता स्थापनेत माझा कोणताही अडसर नसेल अशी भूमिका मांडलेल्या एकनाथ शिंदे यांनी गेल्या दोन-तीन दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्व बैठका रद्द केल्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाची चर्चा रखडली आहे. दरम्यान, मुख्यमंत्रीपद निश्चित करण्याकरता भाजपाकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपाने निरिक्षकांची नावे जाहीर केली आहेत.

भाजपाने सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची महाराष्ट्र विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. या बैठकीत विधिमंडळ नेता निवडला जाणार आहे. विधीमंडळ नेता म्हणजे जो सरकारचे नेतृत्व करणार म्हणजेच मुख्यमंत्र्याची निवड केली जाणार आहे. रुपाणी आणि सीतारामण बुधवारी मुंबईत भाजपाच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींची भेट घेणार आहेत. या बैठकीनंतर मुख्यमंत्रीपदासाठी निवडलेल्या उमेदवाराचे नाव दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना कळवले जाईल. त्यानंतर या निरीक्षकाकडून मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराची घोषणा केली जाईल, असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि विजय रुपाणी यांनी निरिक्षपदी नियुक्ती

हेही वाचा >> Deepak Kesarkar : शपथविधी कार्यक्रमाच्या तयारीला वेग; भाजपाकडून पाहणी, शिवसेनेत नाराजी? नेते म्हणाले, “मोठा भाऊ…”

बुधवारी बैठक, गुरुवारी शपथविधी

शिंदे यांच्या अनुपस्थितीतच पवार यांच्याशी चर्चा करून भाजपाने शपथविधी समारंभ ५ डिसेंबरला आयोजित करण्याची घोषणा केली. पण अजून महायुतीतील तीनही पक्षांना किती मंत्रीपदे मिळावीत, खातेवाटप कसे असावे आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्याकडून मंत्रीपदांसाठी कोणाची निवड केली जाणार, या बाबींवर शिंदे, फडणवीस व पवार यांच्यात सोमवारपासून चर्चा सुरू होणार होती. परंतु, एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी सर्व बैठका रद्द केल्या. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील चर्चेतून मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटपावरून तोडगा निघाला नाही तर पुन्हा दिल्लीत चर्चेची आणखी एक फेरी होऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे. शिंदे हे माघार घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत हेच त्यांच्या देहबोलीवरून स्पष्ट झाले. त्यामुळे बुधवार, ४ डिसेंबरलाच नव्या मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर करण्याते येणार आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जवळपास निश्चित झाल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे चार डिसेंबरला त्यांचंच नाव जाहीर होऊ शकतं.