कोल्हापूर : कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला महाराष्ट्र शासनाचा विरोध आहे. परिस्थितीवर राज्य शासनाचे लक्ष असून, प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात येईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केले. शिरोळ तालुक्यातील नांदणी येथे आयोजित केलेल्या पंचकल्याणक महामस्तकाभिषेक महोत्सवावेळी ते बोलत होते.
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या हालचाली कर्नाटक शासनाने सुरू केल्या आहेत. अलमट्टी धरणाच्या सध्याच्या उंचीमुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला महापुराचा धोका संभवतो. अशातच कर्नाटक शासनाने धरणाची उंची आणखी पाच मीटर वाढवण्याचा प्रयत्न चालू केला आहे. यामुळे या परिसरात महापुराचा तीव्रता वाढून होणाऱ्या संभाव्य नुकसानीमुळे भीतीचे वातावरण आहे. हाच मुद्दा शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या कार्यक्रमात बोलून दाखवला. याचा संदर्भ घेऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘अलमट्टी धरणाबाबत राज्य शासन लक्ष ठेवून आहे.
हेही वाचा…रायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुली असुरक्षित; वर्षभरात ७४ प्रकरणे उजेडात
त्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे. समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे. शासनाचा प्रयत्न पूरस्थिती नियंत्रणात आणण्याचा आहे. त्यासाठी आवश्यकता पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जाऊ.’