मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मी उपोषणाला बसलो आहे. एका बाजूला आमच्याशी चर्चा सुरु आहेत दुसरीकडे गोड बोलून माझा काटा काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे असा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी डॉक्टरांकडून उपचार घेण्यास नकार दिलाय.
मनोज जरांगेंनी मराठा समाजासाठी उभारला लढा
मनोज जरांगेंनी यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठा लढा उभारला. दरम्यान, त्यांच्या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र, मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे अशी मागणी मनोज जरांगेंनी केली असून त्यायावर ते ठाम आहेत. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या आंदोलनाला काही ग्रामस्थांनी विरोध केला होता. आज त्यांनी माध्यमांशी बोलताना सरकार गोड बोलून माझा काटा काढू पाहतंय असा आरोप केलाय.
काय म्हणाले मनोज जरांगे?
“अद्याप दोन ते तीन दिवसांत कुठलाही संवाद सरकारतर्फे झालेला नाही. कुणी संपर्कही केलेला नाही. मी बेमुदत उपोषण सुरु आहे. बैठका घेऊ, निर्णय काढू, लाडीगोडी लावून बोलत आहेत. गोड बोलून काटा काढायचा असा प्रयत्न असल्याचं दिसतं आहे. एकीकडून म्हणायाचं तातडीने मार्ग काढतो. बेमुदत उपोषण सुरु आहे तरीही पाच दिवस होऊ द्यायचे. यामागे सरकारचा डाव असू शकतो.” असाही आरोप मनोज जरांगेंनी केलाय.
हे पण वाचा- मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; उपोषणाचा चौथा दिवस, उपचार घेण्यास नकार
सरकारला मराठ्यांविषयी काहीही माया नाही
“सरकारला मराठ्यांविषयी माया असती तर चार-चार दिवस उपोषण होऊ दिलं असतं का? आम्हाला आमचा फायदा आणि नुकसान कळतं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे जे पडले नाहीत त्यांना म्हणायचं असेल तर त्यांनी थोडं थांबावं. मला खेळवण्याचा खेळ चालला आहे असंच मला वाटतं आहे. मराठे त्यांना तडाखा देतील. डॉक्टर म्हणाले बीपी लो झालं आहे. मी उपचार घेणार नाही. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे.” अशी ठाम भूमिका मनोज जरांगेंनी घेतली आहे.
सरकारकडून उत्तर येणार का?
मनोज जरांगेंनी जो आरोप केला आहे तो गंभीर आहे. आता याबाबत सरकारकडून काही वक्तव्य किंवा प्रतिक्रिया येणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मनोज जरांगेंचं बेमुदत उपोषण आंदोलन हे ४ जून पासून सुरु होणार होतं. मात्र राज्यात आणि देशात आचारसंहिता असल्याने त्यांनी ते ८ जूनपर्यंत पुढे ढकललं. ८ जून ते ११ जून या कालावधीत त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचे उपचार घेण्यास नकार दिला आहे. तसंच सरकारकडून माझा काटा काढण्याचा प्रयत्न होतो आहे असा गंभीर आरोपही केला आहे.