मोहनीराज लहाडे, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नगर : नगरच्या तरुण इतिहास संशोधकाने केलेल्या संशोधनाची राज्य सरकारने दखल घेत कुणबी जातीच्या नोंदी शोधण्यासाठी नव्या निकषांचा समावेश करत सुधारित आदेश जारी केले आहेत. ‘इसमवारी यादी’ आणि ‘खानेसुमारी तक्ता’ असे ही दोन ऐतिहासिक कागदपत्रे असून त्यातही अनेक जातीसमूहांच्या कुणबी अशा नोंदी मिळत आहेत. या नव्या निकषानुसार आतापर्यंत मराठवाडयात सुमारे २५ हजारांवर नोंदी आढळून आल्या आहेत. डॉ. संतोष यादव असे या तरुण संशोधकाचे नाव आहे. ते नगरच्या ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाचे अभिरक्षक व मोडी लिपी वाचक आहेत.

राज्य सरकार आतापर्यंत कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदीसाठी भूमीअभिलेखकडील सात-बारा, आठ-अ, फेरफार, क पत्रक, कडई पत्रक आदी प्रचलित दस्तऐवजांचा आधार घेत होते. आता त्यामध्ये निजामशाहकालीन ‘नमुना क्रमांक ३३’ (प्रतीकडील इसमवारी यादी) व ‘नमुना क्रमांक ३४ ’ (खानेसुमारी तक्ता) चा समावेश करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. तसा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने १ डिसेंबर २०२३ रोजी जारी केला आहे. राज्य सरकारने कुणबी नोंदीच्या शोधासाठी स्थापन केलेल्या न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने स्वीकृत केलेल्या पहिल्या अहवालाच्या आधारे ही कार्यवाही करण्यात आली आहे. समितीच्या निदर्शनास ही बाब डॉ. संतोष यादव यांनी आणून दिली होती.

हेही वाचा >>> “आमच्याशी दगाफटका झाला, लोकांना विनाकारण…”, महाजनांपुढे जरांगे-पाटलांची संतप्त प्रतिक्रिया

संतोष यादव सन २०१० मध्ये आपल्या ‘पेशवेकालीन अहमदनगर’ या विद्यावाचस्पतीच्या संशोधनासाठी मोडी दस्तऐवजांचा राज्यातील विविध अभिलेख, पुराभिलेखागारांमध्ये शोध घेत असता आष्टी (बीड) येथील भूमिअभिलेख कार्यालयात त्यांना अशी नोंद प्रथम आढळली होती. निजामशाहने १८८१ ते १९१० दरम्यान इसमवारी (जनगणना) केली होती. त्यात नमुना क्रमांक ३३ मध्ये घरमालकाच्या कौलारू, धाबी, छप्पर अशा घरांच्या नोंदी करताना व नमुना क्रमांक ३४ मध्ये पशुपालकांच्या नोंदी करताना त्याच्याकडे किती जनावरे, बैलगाडी आहे का, राहणीमान कसे आदी नोंदी करताना दोन्ही प्रकारच्या दस्तऐवजात जातीची, तसेच ‘कुणबी’ची नोंद केली होती. या सर्व नोंदी मोडी लिपीतील आहेत. संतोष यादव यांच्या संशोधनात ही बाब आढळली. यापूर्वी कुणबी नोंदी शोधासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कोणत्याही आयोगाच्या ही बाब निदर्शनास आली नव्हती.

निजामशाहीमध्ये ६५ प्रकारचे दस्तऐवज मोडी लिपीत आढळतात. या नोंदी खूप बारकाईने ठेवल्या जात होत्या. यातीलच इसमवारी यादी आणि खानेसुमारी तक्ता या दोन कागदपत्रांमध्येही ‘कुणबी’ या शब्दाच्या नोंदी आढळल्या. आता नव्या ‘कुणबी’ शोधमोहिमेत मराठवाडा भागात या कागदपत्रांचाही उपयोग होईल.

डॉ. संतोष यादव, अभिरक्षक, ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय, नगर

डॉ. संतोष यादव यांनी लातूर, रेणापूर भागातून गाव नमुना क्रमांक ३३ व ३४ मध्ये कुणबी नोंदी प्रथम दाखवून दिल्या. त्यानुसार आता नव्याने ‘कुणबी’ नोंद शोधली जाणार आहे.

– वर्षां ठाकूर-घुगे, जिल्हाधिकारी, लातूर

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government issued revised orders incorporating new criteria for searching records of kunbi caste zws