मुंबई : राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या भारतीय पोलीस सेवेतील बदल्यांना आणि बढत्यांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. गृह मंत्रालयाने बुधवारी या अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नवीन नियुक्त्यांचे आदेश जारी केले आहेत.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे प्रमुख सहआयुक्त मििलद भारंबे यांच्या खांद्यावर राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी देत विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर भारंबे यांच्या जागी सुहास वारके हे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहआयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. धडक कारवाई आणि निर्णयांमुळे सध्या राज्यात चर्चेत असलेले नाशिक शहरचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची राज्य पोलिसांच्या महिला अत्याचार प्रतिबंधक विभागात विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर नेमणूक करण्यात आली आहे. तर व्हीआयपी सुरक्षा विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांना बढती देऊन नाशिक शहर पोलीस उपायुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पुणे शहराचे सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांची राज्य मानवी हक्क आयोग येथे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती करत मुंबई पोलीस दलातील पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना बढती देत पुणे शहर सहआयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. ठाणे शहराचे सहआयुक्त सुरेशकुमार मेकला यांची गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची राज्याच्या व्हीआयपी सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून सुधारसेवा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अंकुश शिंदे यांच्यावर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक लख्मी गौतम यांना बढती देत राज्य पोलीस दलाच्या आस्थापना विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी, मुंबई पोलीस दलातील वाहतूक शाखेचे अपर पोलीस आयुक्त सत्यनारायण यांना बढती देत राज्याच्या सागरी सुरक्षेच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी आणि मीरा-भाईंदर-वसई-विरार आयुक्तालयातील अपर पोलीस आयुक्त एस. जयकुमार यांना बढती देत राज्य पोलीस दलाच्या प्रशासन विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली आहे.
मुंबई पोलीस दलातील उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पडवळ यांना बढती देत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या सहपोलीस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर मुंबई पोलीस दलातील सशस्त्र दलाचे अपर पोलीस आयुक्त वीरेंद्र मिश्रा यांची मुंबईतील उत्तर प्रादेशिक विभागाच्या अपर पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.