ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना त्यांच्या भ्रष्ट्राचार निर्मुलन संस्थेचे नाव बदलण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली आहे. राज्याच्या धर्मादाय आयुक्तांकडून पाठविण्यात आलेल्या या नोटीसमध्ये अण्णांनी त्यांच्या संस्थेच्या नावातून भ्रष्टाचार हा शब्द वगळावा, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. भ्रष्ट्राचार निर्मुलनाचे काम हे कोणत्याही संस्थेचे नसून ती सरकारची जबाबदारी असते. याउलट संस्थांचे कार्य धार्मिक आणि समाजसेवेशी संबंधित असते. त्यामुळे संबंधित संस्थांनी आपल्या नावातून भ्रष्ट्राचार हा शब्द वगळावा, असे स्पष्टपणे या नोटीसीत म्हटले आहे. यासाठी अण्णा हजारेंना १५ दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. भ्रष्ट्राचार निर्मुलन संस्थेबरोबरच राज्यातील अन्य १२ संस्थांना अशाप्रकारच्या नोटीसी पाठविण्यात आल्या आहेत. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार निर्मुलन संस्थेने आजपर्यंत राज्यामध्ये अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांविरुद्ध लढा दिल्याचा इतिहास आहे.