पुढील तीन महिने हे दुष्काळामुळे बिकट असून कोणत्याही शेतकऱ्यावर खर्चाचा अतिरिक्त भार पडणार नाही याची काळजी सर्वानी घेण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शहादा येथे व्यक्त केले. जळगावमध्ये सत्ताधारी भाजपच्या नेत्यांवर सडकडून टीका करणाऱ्या पवारांनी नंदुरबारमध्ये ग्रामपचायंत निवडणूक आचारसंहितेचा धसका घेत राजकीय वक्तव्य टाळले. परंतु याच कार्यक्रमात माजी मंत्री सुरेश धस यांनी ‘अच्छे दिन’चा विषय आणि रोहित वेमुल्लाची आत्महत्या या पाश्र्वभू्मीवर केंद्र आणि राज्य सरकारला चिमटे काढले.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या योजनेतंर्गत शहाद्यातील पूज्य साने गुरुजी शैक्षणिक संकुलात उभारण्यात आलेल्या क्रीडा प्रशिक्षण सुविधा केंद्राचे (इनडोअर स्टेडियम) पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी पवार यांनी सध्याच्या युगात बुद्धिमत्ता, ज्ञान आणि गुणवत्तेला प्राधान्य असल्याने दर्जेदार अद्ययावत शैक्षणिक संकुले ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या कार्यालाही त्यांनी उजाळा दिला. याच कार्यक्रमात सुरेश धस यांनी मात्र ‘अच्छे दिन’च्या विषयावरून केंद्र शासनावर टीकास्त्र सोडले. राज्यातील शिक्षण खाते तर फक्त शासन निर्णय काढण्यात आणि तो मागे घेण्यातच व्यस्त असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी कार्यक्रमाला शैक्षणिक संस्थेचे प्रमुख दीपक पाटील, माजी आमदार शरद गावीत, राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गावित आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा