अलिबाग – राज्यशासनाच्या वतीने खालापूर तालुक्यातील उंबरखिंड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. हा देशातील पहिला धनुष्यबाण हाती असलेला शिवाजी महाराजांचा पुतळा असणार आहे अशी घोषणा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. उंबरखिंड येथील विजयोत्सवाचे प्रतीक म्हणून हे भव्य स्मारक उभारले जाणार आहे. 

हेही वाचा >>> महाविकास आघाडीच्या प्रस्तावास छत्रपती संभाजीराजे यांचा नकार; स्वराज्यकडूनच लोकसभा लढणार

उंबर खिंड संग्रामाच्या ३६३ व्या विजय दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र थोरवे,अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे,शिवव्याख्याते श्री. भोपी , प्रशांत देशमुख, शिवदुर्ग चे सुनील गायकवाड, उद्योग विभागाचे अध्यक्ष उदय सावंत,संतोष पाटील, उपविभागीय अधिकारी अजीत नैराळे, तहसीलदार आयुब तांबोळी,स्थानिक सरपंच आखाडे व ग्रामस्थ उपस्थित होते. उंबरखिंड येथील ३६३ वर्षांपूर्वीची प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज  आणि मुघल साम्राज्याविरोधात लढाई  झाली होती. २ फेब्रुवारीला २५ ते ३० हजार मुघल सैनिकांना दिड ते दोन हजार मावळ्यांनी त्यांचा पराभव केला होता. ही लढाई धनुष्यबाणांचा वापर करून लढली गेली होती. या लढाईमध्ये शिवाजीमहाराज स्वतः सहभागी झाले होते. हीबाब लक्षात घेऊन उंबर खिंड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आगळे वेगळे उभारले जाणार आहे. पाठीवर बाणांचे भाते, एका हातात धनुष्य व दुसऱ्या हातात बाण, कमरेला तलवार, मस्तकावर शिरस्त्राण, शरीरावर चिलखत व ढाल ह्या युद्धसज्ज वेशात अश्वारुढ असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा याठिकाणी उभारण्यात येणार आहे.  या कामाची तात्काळ पुर्ण रुपरेषा ठरवली असून  एका वर्षाच्या आत जागतिक दर्जाच्या धनुष्यधारी अश्वारूढ पुतळ्याची उभारणी करण्यात येईल असा ठाम विश्वास पालकमंत्र्यांनी  यावेळी व्यक्त केला.  या स्मारकाच्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची  ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असल्याचे  सामंत यांनी यावेळी सांगितले.

Story img Loader