पुढील वर्षी नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधीचा तुटवडा भासू लागला असून अद्याप अनेक कामे प्रलंबित असल्याची टीका करीत विरोधकांनी आज विधान परिषदेत रोष व्यक्त केला. सरकारकडून होणाऱ्या दिरंगाईचा निषेध करत जयवंत जाधव यांनी या मुद्दय़ावरून सभात्याग केला. कोणत्याही परिस्थितीत शासन या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनाकरता निधी कमी पडू देणार नाही व केंद्राकडूनही आवश्यक निधी आणला जाईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सभागृहात दिले.  
 जाधव यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना विधान परिषदेत मांडली होती. नाशिक येथे दर १२ वर्षांनी होणारा कुंभमेळा २०१५ मध्ये होणार असून सुमारे ५० लाख लोक यानिमित्ताने नाशिक येथे येण्याची शक्यता आहे. या आयोजनाकरिता एकूण १ हजार ५० कोटी ६१ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. कुंभमेळ्याला केवळ ५ ते ६ महिन्यांचा कालावधी असताना अजूनही बरीच कामे अपूर्ण असल्याची टीका जाधव यांनी या वेळी केली. ही कामे पूर्ण करण्यासाठी निधीचा तुटवडा भासत असून केंद्र शासनाकडून मदत मिळण्याबाबतही अजून स्थिती स्पष्ट झालेली नाही. याबाबत, नागरिकांमध्ये नाराजी असून शासनाने ताबडतोब पावले उचलणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
 राष्ट्रवादीचे हेमंत टकले यांनी सिंहस्थ पर्वणीचे निमित्त साधून नाशिक व परिसराचा पुढील १२ वर्षांतील विकासाची दृष्टी सरकारने बाळगली पाहिजे, असे मत मांडले. सिंहस्थ कुंभमेळ्याला येणारे अनेक भाविक दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्य़ातील प्रकाशा येथेही भेट देतात. त्यामुळे, प्रकाशा तीर्थस्थळाच्या विकासाच्या दृष्टीने देखील सरकारने प्रयत्न केले पाहिजे, असेही मत सदस्यांनी मांडले.

Story img Loader