मुख्यमंत्र्यांची आज वैद्यकीय तज्ज्ञांशी चर्चा
मुंबई : करोना रुग्णसंख्या घटल्याच्या पाश्र्वभूमीवर १ ऑगस्टपासून राज्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती झाली. यानुसार दुकानांच्या वेळा वाढवून दिल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तज्ञांचा समावेश असलेल्या कृतिदलाच्या सदस्यांबरोबर चर्चा के ल्यावर अंतिम निर्णय घेणार आहेत.
दिल्ली, कर्नाटक आदी राज्यांनी निर्बंध शिथिल के ले आहेत. राज्यात रुग्णसंख्या आणि संसर्गदर कमी झाल्याने निर्बंध शिथिल के ले जावेत, अशी मागणी बहुतेक मंत्र्यांनी के ली. यानुसार येत्या १तारखेपासून सध्या लागू असलेले र्निबध काही प्रमाणात शिथिल के ले जातील. सध्या सायंकाळी ४ पर्यंत दुकाने खुली ठेवण्यास परवानगी आहे. ही वेळ सायंकाळी ७ पर्यंत वाढविली जाण्याची शक्यता आहे. दुकाने आणि उपहारगृहांच्या वेळेत वाढ करावी ही मागणी मंत्र्यांनी के ली.
राज्यातील करोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या घटली आहे. मृत्यूदरही जूनमधील २.३८ टक्क्यांवरून १.२४ टक्के इतका कमी झाला आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्याही ८२ हजारांवर आली आहे. ही घट ७२.८८ टक्के आहे. पुणे, ठाणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या पाच जिल्ह्य़ांत ४९ हजार रुग्ण आहेत.
तर मुंबई, अहमदनगर, सोलापूर, बीड, रत्नागिरी या पाच जिल्ह्य़ांत २० हजार ३८६ रुग्ण आहेत. अशारितीने एकू ण १० जिल्ह्य़ांत राज्यातील एकूण ८२ हजार सक्रीय रुग्णांपैकी ६९ हजार ६०८ रुग्ण आहेत. म्हणजेच राज्यातील सक्रीय रुग्णांच्या ८४ टक्के रुग्ण हे या १० जिल्ह्य़ांत आहेत, अशी माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.
तसेच हे १० जिल्हे व उस्मानाबादमध्ये रुग्णवाढीचा साप्ताहिक दर ०.१० टक्के व त्यापेक्षा अधिक आहे.
करोना रुग्णांची संख्या अधिक असलेले जिल्हे वगळता इतर अनेक जिल्ह्य़ांत करोना रुग्णसंख्या कमी आहे. त्यामुळे हे १०-११ जिल्हे वगळता इतर ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचा विचार के ला पाहिजे. शाळा-महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी देण्याबाबतही पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. मुंबईतील उपनगरी रेल्वेसेवा आणखी काही लोकांसाठी सुरू करण्याचाही विचार झाला पाहिजे. लसीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना सवलत मिळाली पाहिजे, असा मु्द्दा मांडण्यात आला.
राज्यातील ९ जिल्ह्य़ांत रुग्णवाढीचा दर राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे हे ९ जिल्हे वगळून निर्णय घ्यायचा की ०.१० टक्के रुग्णवाढीचा निकष लावून ११ जिल्ह्य़ांत निर्बंध ठेवायचे व इतर जिल्हे वगळायचे, निर्बंधांची स्तररचना काय ठेवायची या विविध विषयांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आरोग्यविषयक कृती गटातील तज्ज्ञांसह चर्चा करून निर्बंध शिथिलीकरणाबाबत अंतिम निर्णय घेतील, असे मंत्रिमंडळ बैठकीत ठरले.
आज बैठक
मुख्यमंत्री उपनगरी रेल्वे प्रवासाची सवलत देण्यासह निर्बंध शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आरोग्यविषयक कृती गटातील तज्ज्ञ डॉक्टरांशी गुरुवारी चर्चा करणार असून त्यानंतर या सर्व गोष्टींवर निर्णय घेण्यात येईल, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. रेल्वे गाडय़ांमध्ये सामान्यांना प्रवासास परवानगी देण्याची मागणी होत असली तरी तशी परवानगी लगेचच मिळण्याची शक्यता कमी असल्याचे संके त देण्यात आले.