अयोध्येत प्रभू रामाच्या मंदिराचे काही दिवसांपूर्वी उद्घाटन झाले. देशभरातील भाविक प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत जात जात आहेत. महाराष्ट्रतील भाविकदेखील वेगवेगळ्या मार्गांनी अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील नागरिकांची अयोध्येत गेल्यानंतर गैरसोय होऊ नये म्हणून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे अयोध्या तसेच जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे महाराष्ट्र भवनाची उभारणी केली जाणार आहे.
अयोध्या आणि श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवनाची उभारणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (२७ फेब्रवारी) राज्य सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी कृषी, उद्योग, आरोग्य, शिक्षण, पर्यटण अशा वेगवेगळ्या क्षेत्रांच्या विकासासाठी काय-काय तरतुदी करण्यात आल्या आहेत, याची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारतर्फे अयोध्या आणि श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवनाची उभारणी केली जाईल, असे सांगितले.
अजित पवार यांनी नेमके काय सांगितले?
“राज्यातील पर्यटक तसेच भाविकांना किफायतशीर दरात उत्तम सुविधा पुरवण्यासाठी जम्मू काश्मीरमधील श्रीनगर तसेच श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या दोन्ही ठिकाणी राज्य शासनाने अतिशय मोक्याच्या जागा उपलब्ध करून घेतल्या आहेत. या जागांसाठी ७७ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे,” असे अजित पवार यांनी सांगितले.