लंडन शहरातील ‘स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये शिक्षण घेत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या घरात राहत होते, ते घर विकत घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी यासंबंधीची घोषणा केली. तब्बल 35 कोटींना हे घर विकत घेण्याचा निर्णय झाला असून, सध्या घर ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय, येत्या 14 एप्रिलपर्यंत हे निवासस्थान ताब्यात घेऊन त्या ठिकाणी डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा गौरव करणारे स्मारक उभारण्याचा सरकारचा मानस असल्याची माहितीही तावडे यांनी दिली.
सन १९२१-२२ मध्ये डॉ. आंबेडकर राहत असलेले घर विकत घेण्याची इच्छा राज्य सरकारने केंद्राला पत्राद्वारे काही दिवसांपूर्वी कळविली होती. लंडनमधील किंग हेनरी रस्त्यावरील २,०५० चौरस फुटांच्या ही वास्तू काही दिवसांपूर्वी ४० कोटी रूपयामंध्ये लिलावात काढण्याचा निर्णय घरमालकाने घेतला होता . लंडनमधील ‘द फेडरेशन ऑफ आंबेडकरीज अॅन्ड बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन’ (फाबो) संघटनेने राज्य आणि केंद्र सरकारला ही वास्तू ४० कोटी रूपयांमध्ये लिलावात काढण्यात आल्याची माहिती कळविली होती.

Story img Loader