वाई:छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या तर्फे साताऱ्यात साजरा होणाऱ्या पारंपारिक शाही दसरा सोहळ्यामध्ये यावर्षीपासून शासनाचा सहभाग असणार आहे. पारंपारिक लवाजम्यासह मोठ्या दिमाखात सोहळा साजरा होण्यासाठी सर्व विभागांनी आपआपले योगदान द्यावे, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.
हेही वाचा >>> मराठा आंदोलकाची आत्महत्या, मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारला किती मुडदे…”
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात दसरा उत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, पोलीस अधीक्षक समिर शेख, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादवे घुले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, सुनिल काटकर, पंकज चव्हाण ,संग्राम बर्गे, जितेंद्र खानविलकर, काका धुमाळ, विनित पाटील, आदी उपस्थित होते.
हेही वाचा >>> बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत संस्थांबाबत मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, सरकार आखणार धोरण!
शाही दसरा मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी प्रांताधिकारी सातारा यांना सन्मवयक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. जलमंदिर येथे पालखीमध्ये भवानी तलवार पुजनावेळी पोलीस बॅन्ड पथकाची मानवंदाना,मिरवणुकीमध्ये घोडे, उंट यांचाही वापर करावा. यावर बसणाऱ्यांना मावळ्यांचा पोशाख द्यावा. पालखी सोबत समारंभाच्या पोषाखातील पोलीस पथक ठेवावे. शासनातर्फे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित करावे. दसरा शाही मिरवणुकीला सायंकाळी साडे पाच वाजता सुरुवात होईल. ही मिरवणूक जलमंदिर ते शिवतिर्थ अशी होईल. त्याचबरोबर शाही पोवाड्याचे आयोजन करावे. राजपथ मार्ग नगर परिषदेने स्वच्छ करावा. तसेच शासकीय कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी विद्युत रोषणाई करावी. मिरवणूकीच्या प्रारंभी पोलीस पायलेटींग ठेवावे. या वर्षीचा शाही दसरा सर्वांच्या सहभागाने उत्साहात साजरा करावाचा आहे. त्या दृष्टी जबाबदारी दिलेल्या विभागांनी योग्य ते नियोजन करावे, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.