महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेलं एक विधान सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. या विधानावरून राज्यपालांवर टीका होऊ लागली असून त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर पाठवण्याची मागणी केली जात आहे. यासंदर्भात संभाजीराजे छत्रपती, संभाजी ब्रिगेड, शिवसेना अशा सर्वांनीच टीका केलेली असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही राज्यपालांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. त्यामुळे आता या वक्तव्यावरून राज्यात नवं राजकारण रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमका वाद काय?

हा सगळा वाद मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून सुरू झाला. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मानद डी लिट पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या भाषणादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्यावरून प्रतिक्रिया उमटू लागल्या.

“आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

नेमकं काय म्हणाले राज्यपाल? – “शिवाजी जुन्या काळातले आदर्श, मी नव्या…”, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं वक्तव्य चर्चेत!

“राज्यपाल वादग्रस्त वक्तव्य करण्यात पटाईत”

दरम्यान, राज्यपालांच्या या विधानावरून संभाजीराजे छत्रपती यांच्यासह संभाजी ब्रिगेड आणि राज्यातील इतर वर्गांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना अमोल मिटकरींनी राज्यपालांच्या विधानाचा निषेध केला आहे. “महाराष्ट्राचे राज्यपाल नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करण्यात पटाईत आहेत. जाणीवपूर्वक त्यांना प्रसिद्धीची हाव आहे का असा प्रश्न निर्माण होईल अशी त्यांची वर्तणूक आहे. याआधीही त्यांनी महाराष्ट्राबाबत, मराठी माणसाबाबत, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत खालच्या पातळीचं वक्तव्य केलं. त्यावर त्यांनी कोणतीही माफी मागितली नाही”, असं अमोल मिटकरी म्हणाले.

“छत्रपती शिवाजी महाराज म्हणण्याचंही औदार्य दाखवलं नाही”

“आज पुन्हा त्यांनी आपली जीभ उचलली आणि टाळ्याला लावली. मराठवाडा विद्यापीठात चालू असलेल्या समारंभात शरद पवार आणि नितीन गडकरी यांना मानाची डी लिट पदवी प्रदान करण्यात आली. तेव्हा हुरळून जाऊन एखादा माणूस जसं गडकरी आणि पवारांनी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी यासाठी बेताल वक्तव्य करावं तसं त्यांनी केलं. ते शिवाजी महाराजांबद्दल एकेरी बोलले. छत्रपती शिवाजी महाराज असं बोलण्याचं त्यांनी औदार्य दाखवलं नाही. कोई गांधी को मानता है, कौई नेहरू को मानता है, कोई सुभाषचंद्र बोस को मानता है असं ते एकेरी बोलले”, अशा शब्दांत अमोल मिटकरींनी राज्यपालांच्या विधानाचा समाचार घेतला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra governor bhagatsingh koshyari remark on shivaji maharaj amol mitkari pmw