नरबळी, अघोरी प्रथा आणि जादूटोणा यावर प्रतिबंध घालून त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी येऊ घातलेल्या विधेयकाच्या सोमवारी झालेल्या सादरीकरणादरम्यान मंत्री, सदस्य, सचिवांच्या संकल्पना स्पष्ट नसून या विधेयकावरील गोंधळ दिसून आला असून अधिवेशनात या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासंबंधी संभ्रम कायम आहे.
‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांचा प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३’, असे या विधेयकाचे लांबलचक नाव असून त्यासंबंधी विधानसभा व विधान परिषद सदस्यांसह, पत्रकार इतर मंडळींसमोर सादरीकरण करण्यात आले. विधान परिषदेच्या सभागृहात झालेल्या सादरीकरणाच्यावेळी सभापती, अध्यक्ष, मुख्यमंत्री उपस्थित होते. सचिव या विधेयकाचा मसुदा मांडत असताना अनेक सदस्यांनी गोंधळ घातला. या विधेयकावर गेल्या अनेक वर्षांपासून असलेले आक्षेप, शंका, कुशंका दूर व्हाव्यात, या अधिवेशनात चर्चेला हे विधेयक येताना त्यावर प्रश्न मांडून त्याची सोडवणूक अपेक्षित असताना आज सादरीकरणाच्यावेळीही विधेयकात नेमक्या काय सुधारणा झाल्या, काय तरतुदी आहेत हे समजून घेण्यापूर्वीच एकप्रकारे गोंधळाचे वातावरण दिसून आले. अंधश्रद्धेचा प्रचार करणाऱ्या मालिकेवर गुन्हा दाखल करणार का?, ‘विधेयकात तीर्थच का म्हटले ‘होली वॉटर’ का नाही’, हातात गंडे दोरे, ताईत, बोटात ग्रहांच्या अंगठय़ा म्हटले पण ‘ताबीज’चा उल्लेख नाही. प्रतापगडमध्ये अफजलखानच्या समाधीवर गेल्यावर मुलगा होतो, असा समज आहे तेव्हा त्याचे काय करणार? असे अनेक प्रश्न या सादरीकरणाच्यावेळी उपस्थित करून गोंधळाचे वातावरण निर्माण करण्यात आले.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी त्या त्या पक्षाचे दोन तीन प्रमुख मिळून असे १२ ते १५ जणांची बैठक अध्यक्ष व सभापतींनी घ्यावी, असा प्रस्ताव ठेवला. आम्ही जादूटोण्याला विरोध करून नरबळीला समर्थन करतो, असा एक संदेश जातो. कायद्यात रूपांतर होण्यापूर्वी विधेयक परिपूर्ण असावे आणि एकमताने विधेयक पारित व्हावे, अशी भूमिका तावडे यांनी मांडली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गटनेत्यांबरोबर उद्या-परवा बैठक घेण्यास सहमती दर्शवली. कोणत्याही धर्माच्या विरोधात हे विधेयक नसून डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी त्यांचे जीवन सर्वस्वी अंधश्रद्धा निर्मूलनात घालवले. त्याची आठवण करून देत सदस्यांनी लेखी प्रश्न, आक्षेप सादर करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. या अधिनियमाला सहमती दर्शविणारीे ८,७३५ निवेदने, तर विरोध करणारी १६५ निवेदने प्राप्त झाल्याचे सचिवांनी सादरीकरणाच्यावेळी सांगितले. भोंदू वैद्य व भोंदूबाबा ऐवजी ‘भोंदू लोक’, मतिमंद ऐवजी ‘मेंटली रिटायर्ड’, दैवी ऐवजी ‘अतिंद्रिय’ आदी सुधारणा केल्याचे सभागृहात सांगण्यात आले.
चर्चेदरम्यान आक्षेपार्ह असे कोणते शब्द मूळ मसुद्यातून वगळले आणि त्या ऐवजी कोणते प्रचारात आणले यावर चर्चा सुरू असताना विनोद तावडे यांनी ‘बाबां’ना ठेवले आणि भोंदू बाबांना वगळल्याची कोटी केली. मुख्यमंत्र्यांकडे तावडे यांचा अंगुलीनिर्देश असल्याचे सदस्यांच्या लक्षात आल्याने सभागृहात खसखस पिकली.