Maharashtra Gram Panchayat Election Results 2022: महाराष्ट्रामधील १८ जिल्ह्यातील एकूण १ हजार ७९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल आज म्हणजेच १७ ऑक्टोबर रोजी जाहीर होत आहे. ७४ टक्के मतदान झालेल्या या निवडणुकींचे प्राथमिक कल हाती आले असून दुपारी दीड वाजेपर्यंत ४०० हून अधिक ग्रामपंचायतींचे निकाल समोर आले आहे. या निकालांमध्ये भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष असून त्या खालोखाल काँग्रेस, ठाकरे गट, शिंदे गट, राष्ट्रवादी या पक्षांना यश मिळाल्याचं चित्र दिसत आहे. मात्र पक्षनिहाय निकाल अयोग्य असल्याचं मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अकोल्यामध्ये प्ररामाध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे. अजित पवार यांना या निकालांमध्ये भाजपा एक नंबरला तर राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर असल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारला असता त्यांनी चिडलेल्या स्वरातच उत्तर दिल्याचं पहायला मिळालं. (येथे क्लिक करुन पाहा लाइव्ह अपडेट्स)
राज्यात शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकासआघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार आलं. यानंतर होत असलेल्या या निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतात यावरून कोणाची किती ताकद हे स्पष्ट होणार आहे. थेट जनतेमधून सरपंच निवडला जाणार या पद्धतीने या निवडणुका पार पडत आहेत. त्यामुळे अनेकांचं या निवडणूक निकालाकडे लक्ष लागलं आहे. याच निवडणुकांचा दुपारी दीड वाजेपर्यंतचा निकाल पाहता भाजपाने इतर पक्षांपेक्षा चांगली कामगिरी केल्याचं दिसत आहे. टीव्ही ९ मराठीने दिलेल्या आकडेवारीनुसार, १ हजार १६५ पैकी ४७१ ग्रामपंचायतींचा निकाल दुपारी दीडपर्यंत हाती आला होता. त्यामध्ये १०१ जागांवरवर भाजपा, ५९ ग्रामपंचायतींमध्ये शिंदे गट विजयी झाला आहे. तर ६१ ग्रामपंचायतींमध्ये ठाकरे गटाने, काँग्रेसने ६२ तर राष्ट्रवादी काँग्रेसने ५० ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळावल्याचं दिसत आहेत. यावरुनच अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला असता ही आकडेवारी धादांत खोटी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांमधील वृत्तांकनावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
“४०० च्यावर निकाल हाती आले आहेत. भाजपा १ नंबरला दिसतंय राष्ट्रवादी चार नंबर दिसतंय,” असं म्हणत पत्रकाराने प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी यावर आपलं मत मांडताना प्रसारमाध्यमांनाच लक्ष्य केलं. “मी तुम्हाला सांगू का हे सगळं तुम्ही धादांत खोटं बोलत असता. मागच्या वेळेसही तुम्ही असं सांगितलं. प्रत्यक्षात वस्तूस्थिती तशी नसते. आमदारकीची निवडणूक चिन्हावर होते. खासदारकीची निवडणूक चिन्हावर होते. जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, नगर पंचायती या चिन्हावर होतात. या ग्रामपंचायतीच्या निवडणुका चिन्हावर होत नाहीत. चिन्हावर निवडणूक होत नसताना तुम्हाला कसं कळलं की हा कुठल्या पक्षाचा आहे?” असा प्रतिप्रश्न अजित पवार यांनी विचारला.
नक्की वाचा >> Andheri Bypoll: “…त्यामुळं त्यांनी चांगला विचार केला असावा”; भाजपाने माघार घेतल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
“माझं तर म्हणणं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांना चिन्हाचं वाटप होतं. तर ग्रामपंचायतीला पण चिन्हावर निवडणुका झाल्या पाहिजेत. म्हणजे स्पष्ट चित्र कळेल. आम्ही पण म्हणतो आमच्या जास्त आल्या. भाजपा म्हणजे आमच्या जास्त जागा आल्या. शिवसेना म्हणते आमच्या जास्त जागा आल्या. काँग्रेस म्हणते आमच्या जास्त आल्या. तुम्ही मिडियावाले कसं चालवता तुमचं तुम्हाला माहिती,” असंही अजित पवार म्हणाले.
“ते त्या पक्षाला मानणारे असतात” असं म्हणत पत्रकाराने उत्तर दिलं. त्यावर अजित पवार यांनी, ठअजिबात नाही. मी ३२ वर्ष झालं राजकारण, समाजकारण करतो,” असं म्हणत ग्रामपंचायतींमध्ये मतदान हे पक्ष पाहून नाही तर उमेदवारांच्या आधारे होत असल्याचं सूचक विधान केलं.