मशिदींवरील भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करुन ते खाली उतरवा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. राज ठाकरेंनी औरंगाबाद येथे जाहीर सभेत कार्यकर्त्यांना मशिदींसमोर हनुमान चालिसा वाजवण्याची सूचना केल्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. सांगली येथे बोलत असताना जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत बोलताना राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
“राज ठाकरे नेहमीच भूमिका बदलतात आणि त्यासाठी वेगवेगळी कारणे असतात. पण ते भूमिका बदलतात हे महाराष्ट्राच्या लक्षात आले आहे. त्यामुळे लोक ते जे करतात ते फारसे गांभीर्याने घेत नाहीत. ते नकला चांगल्या करतात आणि ते बघण्यासाठी सभांना गर्दी होते. लोक गांभीर्याने घेत नाहीत याचे आत्मचिंतन करण्याची गरज राज ठाकरेंना आहे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
नाना पटोलेंच्या आरोपांवर जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर
भंडारा जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि भाजपाने हातमिळवणी करत काँग्रेसने परिषदेचे अध्यक्षपद, तर भाजपाने उपाध्यक्षपद पदरात पाडून घेतले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याला जबाबदार राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक ठिकाणी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, म्हणूनच आम्हाला असा निर्णय घ्यावा लागला असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
“नाना पटोलेंनी केलेल्या आरोपानंतर मी जिल्ह्याच्या तपशील घेतला. त्यातून जो इतिहास समोर आला तो आपल्याला सांगणे आवश्यक आहे. २०१० मध्ये काँग्रेसचे १४ सदस्य निवडून आले होते त्यावेळी सुद्धा काँग्रेस पक्षाने भाजपासोबत युती करुन राष्ट्रवादीला सत्तेच्या बाहेर ठेवले. २०१५ मध्ये राष्ट्रवादीचे १५ तर काँग्रेसचे १६ सदस्य निवडून आले त्यावेळी गोपाळ अग्रवाल आणि इतरांनी भाजपासोबत जाऊन राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवले. या सगळ्या गोष्टी आमच्या प्रमुखांनी राष्ट्रीय पातळीवरील लोकांच्या कानावर घातल्या होत्या पण काही फरक पडला नाही,” अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
“६ मे रोजीच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपासोबत युती करुन त्यांचा सभापती आणि काँग्रेसचा उपसभापती करण्यात आला. १० मे रोजी झालेल्या भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला सोबत घेतले. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी पूर्वी ठरल्या त्यातल्या कोणाचेच पालन काँग्रेसने केले नाही,” असे जयंत पाटील म्हणाले.