Maharashtra Covid Fourth Wave: करोना रुग्णसंख्या सध्या वाढत असताना परिस्थिती मात्र नियंत्रणात आहे. मात्र अशा स्थितीतही चौथी लाट येण्याचा धोका मात्र कायम आहे. करोनाची चौथी लाट येण्याची भीती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. जून, जुलैमध्ये करोनाची चौथी लाट येऊ शकते असं राजेश टोपे म्हणाले आहेत. लसीकरणाचं प्रमाण वाढवणं हेच राज्यासमोरील आव्हान असल्याचंही राजेश टोपे म्हणाले आहेत. जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी चौथ्या लाटेपासून दूर राहायचं असेल तर लसीकरण करण्याचं आवाहन केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“जून, जुलैमध्ये करोनाची चौथी लाट जास्त जीवघेणी ठरत असल्याचं वाटलं तर लसीकरणच तारणहार असणार आहे. लसीकरणाचं प्रमाण वाढवणं महाराष्ट्रासमोर महत्वाचं काम असणार आहे. आरोग्य विभाग याबाबतीत अत्यंत सजग आणि जागरुक राहून लसीकरणाचं काम करत आहे,” असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

मुंबईत काय स्थिती –

एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ापासून मुंबईतील करोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. मुंबईतील बाधितांचे प्रमाण तर आता दोन टक्क्यांच्याही वर गेले आहे. त्यामुळे आता करोनाचा संसर्ग पुन्हा वाढणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ापासून निश्चितच मुंबईतील रुग्णसंख्या वाढत आहे. याआधी शहरातील दैनंदिन रुग्णसंख्या ५० च्याही खाली होती. नंतर ही रुग्णसंख्या साधारण ५० च्या घरात आली; परंतु तिसऱ्या आठवडय़ापासून रुग्णसंख्येत सुमारे ५० टक्क्यांनी वाढ झाली आणि ही वाढ पुढे कायम राहिली आहे. परिणामी, आता दैनंदिन रुग्णसंख्या १०० च्याही पुढे गेली आहे. करोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी बहुतांश रुग्ण लक्षणविरहित आहेत. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण तुलनेने फार कमी आहे. तसेच मृत्यूही जवळपास शून्य आहेत. तेव्हा सर्वेक्षणावर सध्या अधिक भर दिला जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra health minister rajesh tope on fourth wave of covid sgy