महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त दादरमधील शिवाजी पार्क येथे आयोजित मनसे मेळाव्यामध्ये आझानसाठी मशिदींवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांवर आक्षेप घेतलाय. राज ठाकरेंनी प्रखर हिंदुत्ववादाची भूमिका मांडताना मुंबई तसेच मुंब्रा येथील झोपडपट्टय़ांमधील मदरशांमध्ये गंभीर प्रकार सुरू असल्याने त्यांवर धाडी घालण्याची विनंती पंतप्रधानांना करण्याबरोबरच मशिदींवरील भोंगे उतरवा, अशी मागणी केली. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही या वरुन प्रतिक्रिया दिलीय. मात्र एकीकडे या मशिदीवरील भोंग्यांवरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच दुसरीकडे दिलीप वळसे-पाटील यांच्या एका भाषणादरम्यानच मशिदीमधून अजान सुरु झाल्याचा प्रकार घडला. या सभेतील व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
नक्की पाहा हे फोटो >> Photos: सुप्रिया सुळेंनी करुन दिली २१०० कोटींच्या प्रकरणाची आठवण तर अजित पवार म्हणाले, “राज ठाकरे पलटी मारणारा…”
झालं असं की, दिलीप वळसे-पाटील हे सोमवारी शिरुरमध्ये होते. येथील एका जाहीर सभेमध्ये ते भाषण देत असताना अचानक शेजारच्या मशीदीमधून अजान सुरु झाली. त्यानंतर भाषण देत असणाऱ्या दिलीप वळसे-पाटलांनी भाषण थांबवलं आणि ते काही क्षण तसेच उभे राहिले. आझान संपल्यानंतर त्यांनी पुन्हा आपलं भाषण सुरु केलं. सध्या रमजानचा महिना सुरु असून त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरुन व्हायरल होताना दिसतोय.
अजित पवारही थांबले होते
काही आठवड्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यातील खराडी येथील ऑक्सिजन पार्कच्या भूमिपूजनासाठी आले होते. तेव्हा भाषण देताना शेजारच्या मशीदीमधून अजानचा आवाज ऐकू येऊ लागल्यानंतर अजित पवारांनी काहीवेळ आपलं भाषण थांबवलं होतं.
नक्की वाचा >> विश्लेषण : राज ठाकरेंनी पवारांवर केलेल्या टीकेनंतर चर्चेत आलेलं २१०० कोटींचं ‘कोहिनूर स्क्वेअर’ प्रकरण आहे तरी काय?
भोंगे उतरवणं विकासाचा मुद्दा असू शकत नाही
गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानात झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली. सरकारने भोंगे उतरविले नाही तर अशा मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवा, असा आदेश राज यांनी मनसैनिकांना दिला आहे. यावर बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी हा विकासाचा मुद्दा असू शकत नाही अशी खंत व्यक्त केली.
नक्की वाचा >> “पदासाठी, पैशासाठी गद्दारी करणाऱ्यांनी राज ठाकरेंना कितीही…”; नारायण राणेंनी केली राज ठाकरेंची पाठराखण
राजकारणाचा दर्जा घसरला…
“राज्यातील महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. अजानचा भोंगा आहे म्हणून हनुमान चालिसा लावू हा काही विकासाचा मुद्दा होऊ शकत नाही. मग कधी हिंदू, मुस्लिम, जात-धर्म, दुसऱ्या राज्यात घडलेल्या घटनांचे मोर्चे राज्यात काढले जातात त्यावेळी राजकारणाचा दर्जा घसरलेला दिसत आहे”, अशी टीका त्यांनी केली.
नक्की वाचा >> “असे धमकी देणारे खूप गृहमंत्री आम्ही…”; मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मनसेचं दिलीप वळसे-पाटलांना थेट आव्हान
न्यायालयाचा आदेश मान्य करु
“प्रत्येकाने आपल्या मर्यादा पाळल्या पाहिजे. अजानचे भोंगे लावायचे आहेत त्यांनी डेसिबलची मर्यादा पाळली पाहिजे. ज्यांना हनुमान चालिसा लावायची आहे त्यांनीही जरुर लावावी पण तिकडे होते त्याचवेळी लावू हे योग्य नाही. विरोधी पक्षाच्या लोकांनी कोर्टात जाणार असल्याचं सांगितलं आहे. आम्ही कोर्टाचा आदेश मान्य करु,” असं दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.