मुंबई, पुणे : गेल्यावर्षी सर्वाना उत्तीर्ण करण्याचे धोरण बाळगून जाहीर झालेल्या बारावीच्या शंभर टक्के निकालानंतर पदवी अभ्यासक्रमांच्या वाढवून दिलेल्या जागा यंदा कशा भरायच्या हा महाविद्यालयांसमोरील प्रश्न यंदाच्या बारावीच्या निकालाने सोडवल्याचे दिसत आहे. यंदा पारंपरिक पद्धतीने झालेल्या बारावीच्या परीक्षेचा राज्याचा निकाल ९४.२२ टक्के लागला. करोनामुळे गेल्यावर्षी रद्द झालेल्या परीक्षेचा निकाल वगळता यंदाचा निकाल हा आतापर्यंतचा सर्वाधिक निकाल आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी निकाल जाहीर केला. मंडळाचे प्रभारी सचिव माणिक बांगर या वेळी उपस्थित होते. यंदा परीक्षा होणार की नाही या बाबत साशंकता होती. मात्र करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पारंपरिक ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याची भूमिका घेऊन राज्य मंडळाने परीक्षेचे नियोजन केले. यंदा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तेथे परीक्षा केंद्र या धर्तीवर परीक्षेचे नियोजन करून परीक्षा केंद्रे वाढवण्यात आली होती. यंदा परीक्षा दिलेल्या नियमित विद्यार्थ्यांपैकी ९४.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या किंवा परीक्षा न दिलेल्या साधारण ९३ हजार विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची संधी मिळणार असून यातील बहुतेक विद्यार्थी यंदा पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरतील. त्यामुळे गेल्यावर्षी सर्व विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी महाविद्यालयांना वाढवून दिलेल्या जागा यंदाही भरणार असल्याचे दिसते आहे.
(हे ही वाचा: Maharashtra HSC Result 2022: यंदा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के; कोकण एक नंबर तर, मुंबई तळाशी)
यंदा विज्ञान शाखेतील ६ लाख २४ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या ६ लाख २२ हजार ७४९ विद्यार्थ्यांपैकी ६ लाख १२ हजार २०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेतील ४ लाख २० हजार ३९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षा दिलेल्या ४ लाख १५ हजार १२९ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ७५ हजार ७४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेतून नोंदणी केलेल्या ३ लाख ५५ हजार ६२४ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ५३ हजार ९५७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातील ३ लाख २४ हजार ६२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व्यवसाय अभ्यासक्रमाच्या ४७ हजार ८२२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ४६ हजार ९७३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातील ४३ हजार ४०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर आयटीआयच्या नोंदणी केलेल्या ९२७ विद्यार्थ्यांपैकी ९२३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरवर्षीप्रमाणेच मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. मुलांपेक्षा २.०६ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या. राज्यातील विज्ञान शाखेतील आठ, कला शाखेतील सात, वाणिज्य शाखेतील सहा कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला.
निकालाचा नवा विक्रम..
गेल्यावर्षी अंतर्गत मूल्यमापनामुळे भरभरून वाढलेला निकाल यंदा प्रत्यक्ष परीक्षा झाल्यावर घटला. मात्र २०२० मध्ये झालेल्या प्रत्यक्ष परीक्षेच्या निकालाच्या तुलनेत यंदाचा निकालात ३.५६ टक्के वाढ झाली. अपवादात्मक परिस्थितीत करण्यात आलेले गेल्यावर्षीचे मूल्यमापन वगळता यंदाचा निकाल आतापर्यंतचा सर्वाधिक निकाल आहे.
मंडळापुढे बारावीच्या परीक्षेच्या आयोजनाचे आव्हान होते. मात्र सर्वच घटकांनी केलेल्या सहकार्यामुळे विनाअडचण परीक्षा सुरळीत झाली. विद्यार्थ्यांना अर्धा तास वाढवून दिल्याचा, २५ टक्के अभ्यासक्रम कमी झाल्याचा लाभ झाला असे निकाल पाहून म्हणता येईल.
– शरद गोसावी, अध्यक्ष, राज्यमंडळ
विभागवार स्थिती..
कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९७.२१ टक्के, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ९०.९१ टक्के असून, १० हजार ४७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले.
प्रवेश क्षमता अधिक का?
गेल्या वर्षी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला होता. वर्षभर शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांच्या संपर्कात नसलेल्या विद्यार्थ्यांखेरीज बाकी सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले होते. त्यामुळे बारावीला प्रवेश घेतलेले ९९.४५ टक्के विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र ठरले होते. या विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी महाविद्यालयांना एका वर्षांपुरत्या १० ते १५ टक्के प्रवेश क्षमता वाढवून देण्यात आली होती. महाविद्यालयांनीही अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभ्या केल्या होत्या.
दृष्टिक्षेपात निकाल
नोंदणी केलेले नियमित विद्यार्थी – १४ लाख ४९ हजार ६६४
परीक्षा दिलेले नियमित विद्यार्थी – १४ लाख ३९ हजार ७३१
उत्तीर्ण झालेले नियमित विद्यार्थी – १३ लाख ५६ हजार ६०४
निकालाची टक्केवारी – ९४.२२
पुनर्परीक्षार्थी नोंदणी – ३५ हजार ५२७
परीक्षा दिलेले पुनर्परीक्षार्थी – ३५ हजार ६६८
उत्तीर्ण झालेले पुनर्परीक्षार्थी – १८ हजार ७५५
पुनर्परीक्षार्थीच्या उत्तीर्णतेची टक्केवारी – ५३.०२
नियमित आणि पुनर्परीक्षार्थी एकत्रित निकालाची टक्केवारी – ९३.२३
उत्तीर्ण झालेले अपंग विद्यार्थी – ६ हजार ३०१
अपंग विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी – ९५.२४
परीक्षेसाठीचे उपलब्ध विषय – १५३
१०० टक्के निकाल लागलेले विषय – १००
उत्तीर्ण विद्यार्थिनी – ९५.३५ टक्के
उत्तीर्ण विद्यार्थी – ९३.२९ टक्के
क्रीडा गुणांचा लाभ मिळालेले विद्यार्थी – ३ हजार २९९
प्रतिरोधित करण्यात आलेले विद्यार्थी – ११
निकाल राखून ठेवलेले विद्यार्थी – १५८
शाखानिहाय निकाल
ज्ञान – ९८.३० टक्के
कला – ९०.५१ टक्के
वाणिज्य – ९१.७१ टक्के
व्यवसाय अभ्यासक्रम – ९२.४० टक्के आयटीआय
विभागीय मंडळनिहाय निकाल
पुणे – ९३.६१ टक्के
नागपूर – ९६.५२ टक्के
औरंगाबाद – ९४.९७ टक्के
मुंबई – ९०.९१ टक्के
कोल्हापूर – ९५.०७ टक्के
अमरावती – ९६.३४ टक्के
नाशिक – ९५.३ टक्के
लातूर – ९५.२५ टक्के
कोकण – ९७.२१ टक्के
गुणवंत वाढले की घटले?
गेल्यावर्षी अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर केलेल्या निकालात ९१ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले होते. तर २०२०मध्ये झालेल्या प्रत्यक्ष परीक्षेच्या निकालात सात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले होते. यंदा प्रत्यक्ष पद्धतीने झालेल्या परीक्षेत १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. त्यामुळे गुणवंत विद्यार्थी वाढले की घटले असा प्रश्न आहे.
पाच वर्षांचा आढावा
२०१८ – ८८.४१ टक्के
२०१९ – ८५.८८ टक्के
२०२० – ९०.६६ टक्के
२०२१ – ९९.६३ टक्के
२०२२ – ९४.२२ टक्के