करोनानंतर सगळं काही पुन्हा एकदा सुरळीत होत असताना लॉकडाउनचा फटका बसलेल्या मद्य व्यवसायालाही उभारी मिळताना दिसत आहे. महाराष्ट्रात भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यविक्रीत (IMFL) मोठी वाढ झाली असल्याने राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे. २०२०-२१ आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही वाढ १७ टक्क्यांची आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने २०२१-२२ मध्ये गेल्या तीन आर्थिक वर्षातील सर्वाधिक महसूल गोळा केला आहे.
करोना काळात आणि त्यातही लॉकडाउनमुळे मद्य व्यवसायाला खूप मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत होता. पण या आर्थिक वर्षात तब्बल १७ हजार १७७ कोटींची दारु विक्री झाली आहे. २०२०-२१ च्या तुलनेत ही वाढ तब्बल २ हजार कोटींची आहे.
मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात विक्री होऊनही राज्य उत्पादन शुल्क विभागाला आपलं टार्गेट पूर्ण करता आलेलं नाही. विभागासमोर १८ हजार कोटींचं टार्गेट होतं. पण हे टार्गेट पाच टक्क्यांनी मागे राहिलं.
महाराष्ट्रात २०१९-२० मध्ये २ हजार १५७ लाख लीटर दारुविक्री झाली. पण करोनाचा फटका बसल्यानंतर २०२०-२१ मध्ये हा आकडा १ हजार ९९९ वर आला होता. पण पुन्हा एकदा यामध्ये वाढ झाली असून २०२१-२२ मध्ये २३५८ वर पोहोचला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात भारतीय बनावटीच्या विदेशी दारुसोबतच बिअर, देशी दारु आणि वाईनच्या विक्रीतही मोठा वाढ झाली. २०२०-२१ च्या तुलनेत बिअरच्या विक्रीत २०२१-२२ मध्ये १४ टक्क्यांची वाढ पहायला मिळाली. २०१९-२० मध्ये यामध्ये २२ टक्क्यांची घट पहायला मिळाली होती.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या आर्थिक वर्षात सर्व काही सुरळीत झालं असून लोकांची मद्य विकत घेण्याची क्षमता वाढली असल्यानं तसंच मित्रांच्या भेटीगाठी आणि पार्टी यामुळे ही वाढ झाली आहे.