मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सीमावाद पेटला आहे. महाराष्ट्राच्या काही वाहनांवर कर्नाटकमध्ये हल्ला करण्यात आला आहे. तर कर्नाटकच्या काही वाहनांवर महाराष्ट्रात काळं फासलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी पेटताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.
यानंतर आज (बुधवारी) फडणवीसांनी सीमावादप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी फोनवरून चर्चा केली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी गृहमंत्र्यांनी लक्ष घालावं, अशी विनंती फडणवीसांनी अमित शाहांकडे केली आहे. याबाबतची माहिती फडणवीसांनी स्वत: प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
नेमकी चर्चा काय झाली?
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी मी फोनवरून चर्चा केली. सीमाप्रश्नावर अलीकडच्या काळात घडलेली संपूर्ण परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली आहे. विनाकारण महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ले योग्य नाही, हेही त्यांच्या लक्षात आणून दिलं आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी माझा काल फोनवरून झालेला संवादही त्यांच्या कानावर घातला आहे.
हेही वाचा- VIDEO: दिल्लीतील विजयानंतर ‘आप’चा जल्लोष, मनोज तिवारींच्या ‘रिंकीया के पापा’ या गाण्यावर डान्स
“सीमावादावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासित केलं आहे. तरीही गृहमंत्री अमित शाह यांनी यामध्ये लक्ष घालावं. त्यांनीही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगावे, अशी विनंती मी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली आहे. अमित शाह यात निश्चितपणे लक्ष घालतील,” अशा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.