मागील काही दिवसांपासून उफाळून आलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अधिकच वाढताना दिसत आहे. कारण, कर्नाटक सरकारच्या आक्रमक भूमिकेनंतर, सीमाभागांत मराठी भाषकांविरोधातील हिंसक घटना आणि तप्त राजकीय वातावरण शांत करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्थी करण्याची तयारी दाखविली आहे. त्यासाठी १४ डिसेंबर रोजी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावले असून त्यांच्याशी गृहमंत्री चर्चा करणार आहेत. मात्र अमित शाह यांनी दखल घेतल्यानंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचलं आहे. विशेष म्हणजे अमित शाह यांची भेट घेऊन काही होणार नाही असं सांगत त्यांनी थेट केंद्रीय नेतृत्वालाच आव्हान दिलं आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नागपुरात प्रसारमाध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा ट्वीट करून म्हटलं आहे की, तुम्ही अमित शाह यांना भेटले असले तरी आम्ही आमची भूमिका बदलणार नाही. यावर फडणवीस म्हणाले, ते त्यांची भूमिका बदलणार नाही, आपण आपली भूमिका बदलणार नाही. त्यामुळे यातून एकतर चर्चेतून मार्ग निघेल किंवा सर्वोच्च न्यायालयात मार्ग निघेल. कारण, मागील ६० वर्षांत त्यांनीही भूमिका बदलली नाही आणि आपणही भूमिका बदलली नाही. त्यामुळे ते काय फार नवीन सांगत आहेत आणि शोध लावताय असं काहीच नाही.”
याचबरोबर, “महाराष्ट्राची बाजू कर्नाटकपेक्षा भक्कम आहे. मला असं वाटतं प्रत्येकाला बाजू मांडण्याच अधिकार आहे. ते त्यांची बाजू मांडतील, आम्ही आमची बाजू मांडू. आम्ही बाजू मांडतोय याचा अर्थच आम्हाला वाटतं की ती भक्कम आहे. पण हे न्यायालयावर सोडूयात की कोणाची बाजू भक्कम आहे, या संदर्भात वाद करण्याचं कारण काय?”असंही यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
काय म्हणाले आहेत बोम्मई? –
बोम्मई यांनी पुन्हा एकदा ट्वीट केलं असून महाराष्ट्राला डिवचण्याचं काम केलं आहे. “महाराष्ट्रातील शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही. महाराष्ट्राने याआधीही असे प्रयत्न केले आहेत. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टात आमची बाजू भक्कम आहे. सीमावादावर आमचं सरकार कोणतीही तडजोड करणार नाही,” असं बोम्मई म्हणाले आहेत.