विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज(शुक्रवार) प्रसारमाध्यमांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना सध्या उफाळून आलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाचा मुद्दा आणि कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांवर होणारे हल्ले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून केली जाणार विधाने आणि या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची घेतलेली भेट यावर प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या खासदारांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. यावर प्रतिक्रिया देताना विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, “खरंतर गृहमंत्र्यांनी यामध्ये पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. कारण, दोन राज्यांमध्ये जर वेगवेगळे वाद असतील तर केंद्राने लक्ष दिलं पाहिजे. गृहमंत्रालयाच्या महत्त्वाचा सहभाग असला पाहिजे. मागील १५-२० दिवसांपासून जे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलतात, कर्नाटकचे लोक रोज हल्ले करत आहेत, गावांवर दावे सांगतात, वाहनांवर हल्ले करतात आणि अशावेळी केंद्र जर मूग गिळून गप्प बसत असेल, तर काल आणि परवा दोनदा महाविकास आघाडीचे खासदार गृहमंत्र्यांना भेटले आहेत आणि त्यांना विनंती वजा आव्हान केलेलं आहे. मला वाटतं गृहमंत्र्यांनी मार्ग काढला पाहिजे. गृहमंत्र्यांनी मेघालय-आसामच्या सीमा प्रश्नावर अशीच चर्चा केली आहे. तशीच चर्चा या प्रश्नावर होण्याची आवश्यकता आहे.”
ईडीच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबईच्या उच्च न्यायालयात याचिक दाखल झाली. ज्यांची ईडी चौकशी सुरू होती, त्यांचे काही लोक शिंदे गटात गेल्यानंतर त्यांच्या चौकशीचं पुढे काय झालं? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
यावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्हणाले, “नक्कीच, कारण नारायण राणेंच्या चौकशीचा मुद्दा आहे, सरनाईकांची चौकशी, भावना गवळींचा मुद्दा आहे. या सगळ्याविषयी ईडीने सुरुवातीला पावलं उचलली नंतर काय झालं. जर लोक भाजपात गेले किंवा पाठिंबा दिला तर पावन झाले का? म्हणून निश्चित ज्याने कोणी याचिका दिली असेल. ती अतिशय स्वागतार्ह आहे आणि ईडीला यावर उत्तर द्यावच लागेल. कारण, ईडी ही केंद्रातील भाजपाच्या सरकारच्या हातातलं बाहुलं बनू पाहतय. म्हणून निश्चितच ही याचिका योग्य आहे.”