बेळगावमधील हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या काही वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून मंगळवारी (६ डिसेंबर) हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर आपली भूमिका मांडली. शरद पवार यांनी राज्य सरकारला ४८ तासांचे अल्टिमेटम दिले असून कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील तणाव निवळला नाही तर मला तेथे जावे लागेल, असा इशारा दिला. दरम्यान, पवार यांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. शरद पवार फक्त बोलत नाहीत तर ते करून दाखवतात. तसे झाले तर अख्खा महाराष्ट्र कर्नाटकमध्ये असेल, असे रोहित पवार म्हणाले. ते मंगळावारी अहमदनगरमध्ये बोलत होते. याबाबतचे वृत्त ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने दिले आहे.
हेही वाचा >>> “…नाहीतर मला बेळगावात जावं लागेल”, शरद पवारांचा कर्नाटक सरकारला ४८ तासांचा वेळ
“सध्या कर्नाटक, महाराष्ट्र आणि केंद्रात भाजपाची सत्ता आहे. कर्नाटकमध्ये काही दिवसांनंतर निवडणूक आहे. त्यामुळे निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून जर महाराष्ट्राच्या अस्मितेला बोट लावत असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही. शरद पवार महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमाप्रश्नावर महाराष्ट्राचे नागरिक म्हणून बोललेले आहेत. जेव्हा शरद पवार फक्त बोलत नाहीत तर करून दाखवतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या राज्य सरकारने योग्य भूमिका घ्यावी. अन्यथा शरद पवार जे बोलले आहेत, ते करतील. त्यावेळी अख्खा महाराष्ट्र कर्नाटकात असेल,” असे रोहित पवार म्हणाले.
हेही वाचा >>> शंभूराज देसाईंविषयी विचारलेल्या प्रश्नाला शरद पवारांचे उत्तर, म्हणाले “मी अशा लहान लोकांबाबत…”
“आपल्या राज्य सरकारने राज्याची अस्मिता टिकवण्यासाठी योग्य ती भूमिका घेण्याची गरज आहे. कर्नाटकमध्ये आपल्या राज्यातील गाड्या पेटवण्यात आल्या. काचा फोडण्यात आल्या. हे आपल्या हिताचे नाही. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारला योग्य भूमिका घेण्याची वेळ होती. कर्नाटक सरकारला योग्य पद्धतीने उत्तर दिले असते तर आजची परिस्थिती वेगळी असती. कर्नाटक-महाराष्ट्र सरकारने संवाद करायला हवा होता. केंद्र सरकारने मध्यस्थी करायला हवी होती. संवाद न करता जे घडतंय ते निषेधार्ह आहे. महाराष्ट्र सरकार ठाम भूमिका घेत नाही,” असे मत रोहित पवार यांनी मांडले.