शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा पक्षबांधणी सुरू केली आहे. आज ठाणे येथे आंबेडकरवादी विचारांच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी संबंधित नेत्यांचं स्वागत केलं.
दरम्यान, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधाला. महाराष्ट्र हा शाहू, फुले आणि आंबेडकरांचा आहे, असं आपण म्हणतो. पण फुले-आंबेडकरांचा अपमान करणारा माणूस राज्यपाल पदावर बसलेला असेल आणि तोच माणूस आज पंतप्रधानांच्या व्यासपीठावर बसलेला असेल, तर महाराष्ट्राच्या जनतेनं समजायचं काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
सीमावादावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “एका बाजुला महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पेटला आहे. महाराष्ट्राच्या बाजुने कुणीच बोलत नाहीये. कर्नाटकचे मुख्यमंत्री अतिशय मस्तीत किंवा माज आल्यासारखं बोलत आहेत. काल त्यांनी कहर केला. आपले मुख्यमंत्री मात्र त्यांना स्क्रीप्ट लिहून दिलंय तेवढंच बोलत आहेत. हा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे, असंच ते म्हणत आहेत. पण महाराष्ट्र जसा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत आहे, तसंच कर्नाटकनेही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट बघायला काय हरकत आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा- “काय भिकारड्यासारखा…”, थेट वेळ आली म्हणत अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल!
“सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू असताना, कर्नाटकाकडून बेळगावला उपराजधानीचा दर्जा देण्यात येत आहे. आता डोक्यावरून पाणी गेलं आहे, तरीही आम्ही थंड राहिलो आहोत. पण त्यांनी आता महाराष्ट्रातील इतरही काही गावांवर हक्क सांगितला. बेळगाव आणि निपाणी ही ठिकाणं तर दूरच राहिली, त्यांनी आता सोलापूर आणि अक्कलकोटवरही दावा सांगितला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला कुणी वाली आहे की नाही? असा माझा प्रश्न आहे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.