महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावर काही दिवसांपूर्वी चांगलाच वाद निर्माण झाला होता. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमाप्रश्नी केलेल्या विधानानंतर या वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर सीमाभागात महाराष्ट्रातील काही वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. दरम्यान, काहीही झाले तरी महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकमध्ये जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. याबाबतचा एक ठरावही हिवाळी अधिवेशनात मांडण्यात आला होता. दरम्यान, याच सीमाप्रश्नावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजूने आदेश दिल्यास आम्ही कारवार, निपाणी, धारवाड यासह सीमेवरील मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली. ते आज (८ जानेवारी) कोल्हापूरमध्ये एका सभेला संबोधित करत होते.
हेही वाचा >> “…तर अशोक सराफ मुख्यमंत्री असते,” राज ठाकरेंचे विधान!
“महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा ज्वलंत मुद्दा आहे. निपाणी, कारवार, बेळगाव हा सर्व भाग महाराष्ट्रात आला पाहिजे असे आम्ही नेहमी म्हणतो. आपल्या भागातील वाहनं तिकडे गेल्यानंतर तोडफोड केली जाते. काहीतरी वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलं जातं. आम्हालाही भावना आहेत. ते म्हणतात की आम्ही एक इंच जागा देणार नाही. पण जागा देणारे ते कोण. उद्या सर्वोच्च न्यायालयाने ठरवल्यानंतर आम्ही सर्व जागा महाराष्ट्रात घेतल्याशिवाय राहणार नाही,” असे अजित पवार म्हणाले.
हेही वाचा >> उत्तर प्रदेशमध्ये नवे राजकीय समीकरण? अखिलेश यादव-चंद्रशेखर आझाद यांच्यातील बैठकीनंतर चर्चेला उधाण
“भारतातील प्रत्येक नागरिकाला देशातील कोणत्याही भागात जाण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. हे म्हणतात की मुंबई आमची आहे. यांच्या काकांनी मुंबई यांची ठेवली आहे का? मुंबईमध्ये कानडी लोक आहेत. पण मुंबई महाराष्ट्राची आहे. मुंबईसाठी १०६ जणांनी बलिदान दिलेले आहे. कर्नाटमधील मंत्री पुन्हा-पुन्हा बेताल वक्तव्यं करत आहेत. उभा महाराष्ट्र सीमाभागातील मराठी भाषकांच्या पााठीशी आहे,” अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.